पाल यात्रेनिमित्त मानकऱ्यांनी नियमांचे पालन करावे
पोलीस प्रशासनाचे आवाहन : २२ जानेवारीला मुख्य सोहळा
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
पाल ता. कराड या ठिकाणी २० ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत श्री खंडोबा देवाची वार्षिक यात्रा संपन्न होणार आहे. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३६ प्रमाणे पाल यात्रेतील मानकारी यांच्या घोड्यांच्याबाबतीत अटी व शर्थी संबंधाचे आदेश २२ जानेवारीच्या सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत जारी केले आहेत.
मानकऱ्यांसाठी नियम…
यात्रेच्या मुख्य दिवशीच्या मिरवणुकीमध्ये सामिल होणा-या मानाचा घोडा यास लगाम घातलेला असावा. तसेच मिरवणुकीमध्ये माणसाळलेल्या, शिक्षण दिलेल्या घोड्याचाच वापर करावा. इतर भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. दि.२२ जानेवारी २०२४ रोजी मुख्य मिरवणुकीकरीता ८ वा. मानकरी बाबासाहेब इंजोजीराव पाटील रा. पाल ता. कराड यांचे वाड्यासमोर जमावे व आपल्या मानाप्रमाणे उभे रहावे. दुपारी २ वा. बैलगाडीतून देव देवळातुन मंडपातून मंडपाबाहेर आणल्यानंतर तेथून देवाची मिरवणुक मानकरी देवराज पाटील रा.पाल ता.कराड यांचे समवेत मिरवणूकीने निघावे. सदर वेळी मानाचा घोडा व चोपदार यांनी मिरवणुकीचे पुढे रहावे. सायंकाळी ६ वा.देवाचे लग्नाचा सोहळा संपन्न झाल्यानंतर मानकरी आपला घोडा आपले मुक्कामाच्या ठिकाणी घेवून जातील.
मुख्य मिरवणुकीतील घोडयाची तपासणी संबधित पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून करावी व ते मिरवणुकीस वापरण्यास योग्य आहेत याबाबतचे प्रमाणपत्र घ्यावे. मानकरी यांना वरील प्रमाणे अटी व शर्ती मान्य नसतील तर त्यांनी आपले घोडे मिरवणुकीमध्ये आणु नयेत. मिरवणुकीतील मानकरी यांचे घोड्याचे चालक यांना वरील अटी व शर्तीप्रमाणे वागण्याचे बंधन राहिल. नियमांचे उल्लघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये कारवाईस पात्र राहतील, याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पाल परिसरातील वाहतुकीसंबंधीचे आदेश जारी
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी २० ते २८ जानेवारी २०२४ कालावधीत पाल परिसरातील वातुकीत तात्पुरत्या बदलाचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार काशिळकडून तारळेकडे जाणारी सर्व वाहने निसराळे फाटा- इमरसन कंपनी सासपडे मार्गे तारळेकडे जातील. तारळेकडून काशिळ अथवा कराडकडे जाणारी वाहतुक ही तारळे येथून कोंजावडे फाटा- सासपडे मार्ग खोडद फाटा वरुन कराड कडे जातील. कराड तसेच पाल भागातून तारळे भागात जाण्याकरिता खोडद, ता.जि. सातारा येथील फाटयावरुन इमरसन कंपनी शेजारुन सासपडे मार्गे तारळेकडे जातील. वरील नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडुन कारवाई होईल, असे सांगण्यात आले आहे.
अशी राहील पार्किंग व्यवस्था….
पाल येथे दि.२० ते दि.२८ जानेवारी २०२४ या कालावधीत यात्रेसाठी महाराष्ट्रातून तसेच शेजारील राज्यातून विविध ठिकाणाहून मोठया प्रमाणात भाविक दर्शनासाठी खाजगी वाहनाने तसेच एस टी बसने येत असतात. यामुळे पाल गावात व उंब्रज शहरात मोठया प्रमाणात वाहतूकीची कोंडी होत असते. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३ (१) (ब) प्रमाणे पाल परिसरातील रस्त्यावरील वाहतूकी संबंधीचे आदेश २० ते दि. २८ जानेवारी पर्यंत जारी केले आहेत.
त्यानुसार काशिळ ते पाल रोडने येणारी सर्व वाहने आदर्शनगर गावाजवळील तात्पुरते एस. टी. स्टॅन्ड समोर थांबवतील व त्याच्या समोरील शेतात पाकींगची व्यवस्था केली आहे तेथे वाहने पार्क करावीत. हरपळवाडी ते पाल येणारी सर्व वाहने ही इमरसन कंपनीजवळ थांबवावीत. तेथील शेतात वाहने पार्क करावीत. तारळे – पाल येणारी सर्व वाहने ही तारळे रोडला पाल ग्रामपंचायतीचे नर्सरी समोर रोडवर थांबवावीत व तेथे पार्क करावीत.
मरळी ते पाल येणारी सर्व वाहने ही खंडोबा कारखान्यासमोर श्रीकांत शेजवळ यांच्या शेताचे समोर थांबवावीत व त्यांचे शेतात केलेल्या पार्कींगमध्ये पार्क करावीत. वडगांव ते पाल हा सर्व रोड आपत्तकालीन रोड असून त्या रोडवर येणाऱ्या सर्व वाहनांना व वाहने पार्किंग करण्यास बंदी आहे. वडगाव ते इंदोली फाटा जाणाऱ्या रस्त्याशेजारी जाग्यवर पार्कींग करीता बंदी घालण्यात येत आहे. दि. २० रोजीच्या रात्री १० ते दि. २२ जानेवारी रोजी रात्री १० वा. पर्यंत पाल गावात येणाऱ्या सर्व वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. वरील नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३१ अन्वये कारवाईस पात्र राहतील, असे पोलीस प्रशासनाकडून सुचित करण्यात आले आहे.