दलित महासंघाच्या संसद मंडळाची बैठक विदर्भातील बुलढाणा येथे होणार
राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे यांची माहिती
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
दलित महासंघ ही महाराष्ट्रातील अत्यंत प्रभावी अशी सामाजिक संघटना यावर्षी दलित महासंघाची व्याप्ती तसेच कार्यक्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने संसद मंडळाची बैठक विदर्भातील बुलढाणा येथे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षणामध्ये अ ब क ड असे वर्गीकरण करण्यात यावे यासाठी फक्त महाराष्ट्रातच नाही तर, संपूर्ण देशभर चळवळ सुरू आहे. या प्रश्नावर दलित महासंघाने यापूर्वीही अनेक आंदोलने केली आहेत. परंतु आजचे आघाडी सरकार हे मराठा किंवा धनगर आरक्षणाच्या बाबतीत जेवढे सक्रिय आहे, तेवढे अनुसूचित जाती आरक्षणाच्या प्रश्नावर सक्रिय दिसत नाही. इथून पुढच्या काळामध्ये अनुसूचित जाती अंतर्गत प्रवर्गामध्ये अ ब क ड करण्यात यावे, त्या दृष्टीने अनुसूचित जाती आयोगाची स्थापना करण्यात यावी किंवा मंत्रिमंडळ स्तरावर आरक्षणाची घोषणा करण्यात यावी.
बार्टी प्रमाणेच मातंग समाजासाठी स्वतंत्र आर्टीची स्थापना करण्यात यावी, मातंग समाजातील लोकांसाठी अण्णाभाऊ साठे महामंडळाचे कर्ज वितरण मोठ्या प्रमाणावर वितरित करावे, मागासवर्गीय महामंडळाकडील दलितांची कर्जे माफ करण्यात यावीत, अशा वेगवेगळ्या विषयावर व्यापक चर्चा करण्याच्या दृष्टीने संसद मंडळाची बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
सदर संसद मंडळाची बैठक सोमवार, दि. १८ डिसेंबर २०२३ रोजी हॉटेल रामा ग्रँड, बस स्टँड समोर, संगम चौक, बुलढाणा येथे होणार आहे. दलित महासंघाचे राष्ट्रीय नेते मच्छिंद्र सकटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न होणार असून, सदर बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रा. पुष्पलता सकटे आणि राष्ट्रीय सरचिटणीस उत्तमराव चांदणे, प्रा.जयंत साठे, शंकरराव महापुरे यांच्यासह राज्य पातळीवरील सर्व नेते, जिल्हाध्यक्ष सदर बैठकीला उपस्थित राहणार आहेत.