शेतकऱ्यांचा ‘हा’ नेता काढणार ५२२ किलोमीटरची पदयात्रा – changbhalanews
राज्यशेतीवाडी

शेतकऱ्यांचा ‘हा’ नेता काढणार ५२२ किलोमीटरची पदयात्रा

चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला शेतकऱ्यांच्या हक्काचा दुसरा हप्ता ४०० रुपये प्रमाणे दसऱ्याच्या सणापूर्वी साखर कारखान्यानी द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju shetti) हे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील २२ गावातून आक्रोश पदयात्रा काढणार आहेत.
२२ व्या ऊस परिषदेच्या निमित्ताने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातून तब्बल ५२२ किलोमीटरची ही पदयात्रा काढली जाणार आहे. १७ ॲाक्टोंबर  ते ७ नोव्हेंबर पर्यंत २२ दिवस ही आक्रोश पदयात्रा चालेल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दसऱ्यापूर्वीच ऊस दराच्या आंदोलनाचा संघर्ष पेटणार की काय? असे बोलले जात आहे.
या आक्रोश पदयात्रेला कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथून सुरुवात होणार असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील २२ गावात व तब्बल ३७ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात मुक्काम करून २२ दिवसानंतर ७ नोव्हेंबर रोजी ही पदयात्रा जयसिंगपूर येथे पोहोचणार आहे. त्यानंतर जयसिंगपूर येथे २२ वी ऊस परिषद भरणार आहे. त्यामुळे यंदा दसऱ्यापूर्वी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दर आंदोलनाचा भडका उडणार की काय? अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झालीय.
असा आहे पदयात्रेचा मार्ग
दत्त साखर शिरोळ, गुरूदत्त, जवाहर, शाहू, सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना, संताजी घोरपडे, बिद्री, भोगावती, कुंभी कासारी, दालमिया, वारणा, बांबवडे, चिखली, निनाईदेवी, वाटेगाव, कृष्णा, राजारामबापू, जी डी बापू लाड, वाळवा हुतात्मा, सांगली सहकारी, सर्वोदय, शरद, पंचगंगा, जयसिंगपूर.
निधी संकलनास जोरदार प्रतिसाद
२२ व्या ऊस परिषदेच्या निमित्ताने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या या पदयात्रेसाठी संघटनेकडून निधी संकलन सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
कारखानदारांच्या भूमिकेकडे लक्ष
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेमुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघणार आहे. त्यामुळे ऊस दराचा संघर्ष वाढण्यापूर्वी साखर कारखानदार तुटून गेलेल्या उसाच्या दुसऱ्या हप्त्याबाबत कोणती भूमिका जाहीर करताहेत याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणताहेत
” शेतकऱ्यांच्या हातात चलन नसेल तर बाजारात पैसा येणार कुठून? यामुळे बाजारातही मंदीची लाट आलीय. आता तुम्हीच बघा वर्षाला गणेश उत्सव काळात मोठा उत्साह असायचा पण यंदा कुठे दिसलाच नाही. तोंडावर दसरा-दिवाळी आलीय. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही, यामुळं व्यापारी, उद्योजक, इतर छोटे व्यावसायिक, कष्टकरी सगळेच अडचणीत आल्यानं ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसताना दिसतोय.या चक्रव्यूहातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या हातात चलन फिरलं पाहिजे. म्हणून आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा दुसरा हप्ता ४०० रुपये साखर कारखान्यांनी दसऱ्याच्या सणापूर्वी द्यावा, या मागणीसाठी ५२२ किलोमीटरची आक्रोश पदयात्रा काढतोय”
   –  राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close