चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा निर्घृणपणे खून
धायटी येथील घटनेने परिसर हादरला, पतीला अटक

चांगभलं ऑनलाइन | चाफळ
चारित्र्याचा संशय घेत पतीने पत्नीच्या डोक्यात फावडे मारून तिचा निर्घृणपणे खून केल्याची घटना धायटी येथे शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या खुनाच्या घटनेने चाफळ विभाग अक्षरशः हादरून गेला आहे. कोमल रमेश पेंढारे (वय 24) असे खून झालेल्या दुर्दैवी पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी पती रमेश पेंढारे याला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धायटी, ता. पाटण येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर पेंढारे हे मुलगा रमेश व सून कोमल यांच्यासह राहत होते. रमेशचा विवाह दीडच वर्षांपूर्वी मारुल हवेली येथील कोमल हिच्याशी झाला होता. पती रमेश हा पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. शनिवारी रात्री रमेश घरी आल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला. यावेळी रमेश याने वडिलांना घराबाहेर ढकलत घराचे दार लावून घेतले. व घरात असलेले फावडे पत्नी कोमल हिच्या डोक्यात मारून तिचा निर्घृणपणे खून केला. या घटनेची माहिती मिळताच पाटणच्या डीवायएसपी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले, पोलीस उपनिरीक्षक रामराम वेताळ, हवालदार सिध्दनाथ शेडगे यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी रमेश पेंढारे याला अटक केली.
रात्री उशिरा ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. या खुनाचा रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. डीवायएसपी सविता गर्जे यांनी घटनास्थळी थांबत अधिक तपासकामी संबंधितांना सूचना दिल्या. या घटनेची नोंद मल्हारपेठ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास सपोनि चेतन मछले करीत आहेत.