डॉक्टर महिलेचे रिक्षातून पडलेले सोन्याचे दागिने अर्ध्या तासात मिळाले परत
कराड शहर पोलिसांनी केली उल्लेखनीय कामगिरी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
डॉक्टर महिलेचे रिक्षातून पडलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आत शोधून दिले. येथील पाटण तिकाटने येथे सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, वारुंजी येथील डॉ. ऐश्वर्या अक्षय पिसाळ या शहरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये कामास आहेत. बुधवारी हॉस्पिटल मधून त्या आपल्या घरी रिक्षा मधून निघाल्या होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या कानातील रिंगा, दोन अंगठ्या व मंगळसूत्र पर्समध्ये एका पाकिटात ठेवल्या होत्या. रिक्षा पाटण तिकटण्यातील उड्डाणपूल क्रॉस करून पुढे निघाली असता, पर्स मधील ते पाकीट पडल्याची जाणीव डॉ. पिसाळ यांना झाली. त्या तात्काळ ते पाकीट शोधण्यासाठी पुन्हा कराडच्या दिशेने निघाल्या. उड्डाणपूलाखाली त्यांना दोन अंगठ्या व कानातील रिंगा सापडल्या, मात्र मंगळसूत्र सापडले नाही. त्यांनी तात्काळ कराड शहर पोलीस ठाणे गाठून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना घडलेला प्रकार सांगितला.
श्री सूर्यवंशी यांनी तत्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख पीएसआय राजू डांगे यांच्या कानावर ही माहिती घातली.श्री डांगे यांनी पोलीस कॉन्स्टेबल संतोष पाडळे यांना दागिन्याचा शोध घेण्यास सांगितले. डॉ. पिसाळ व त्यांचे पती यांना सोबत घेत पोलीस कॉन्स्टेबल पाडळे हे वारुंजी फाट्यापासून दागिने शोधू लागले.अखेर जाधव पेट्रोल पंपाजवळ एका व्यक्तीने त्याला सापडलेले मंगळसूत्र पोलिसांना परत केले. पोलीस कॉन्स्टेबल संतोष पाडळे यांनी अवघ्या अर्ध्या तासातच डॉ ऐश्वर्या पिसाळ यांचे सोन्याचे दागिने परत मिळवून दिले.