दारू पिऊन मारहाण करणाऱ्या मुलाचा वडिलांनी केला खून कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील घटना
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
दारु पिऊन मारहाण करुन घराबाहेर काढणाऱ्या मुलाच्या डोक्यात बापाने लाकडी काठीने मारहाण करून त्याचा खून केला. ही घटना शनिवारी पहाटे घडली.
शरद प्रतापराव मोहिते (वय 42, रा. ज्ञानेश्वर मंदिराजवळ, रेठरे बुद्रुक, ता. कराड) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर प्रतापराव गुलाबराव मोहिते (वय 74, रा. ज्ञानेश्वर मंदिराजवळ, रेठरे बुद्रुक, ता. कराड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी सचिन विलास मोहिते (वय 48 रा. ज्ञानेश्वर मंदिराजवळ, रेठरे बुद्रुक, ता. कराड) यांनी कराड ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रतापराव हे रेठरे बुद्रुक येथे पत्नी कमल व मुलगा शरद सह राहत होते. शरदला दारुचे व्यसन होते. दारूसाठी त्याने घरातील संसार उपयोगी साहित्य, धान्य, टीव्ही विकून टाकले होते. दारु पिल्यानंतर तो वडील प्रतापराव व आई कमल यांना सतत मारहाण व भांडण करून घराबाहेर काढत होता.
शनिवारी पहाटेच्या सुमारासही शरद याने दारूच्या नशेत वडील प्रतापराव यांना मारहाण करून घराबाहेर काढले. त्यानंतर पुन्हा शरद हा प्रतापराव यांना मारण्याच्या उद्देशाने अंगावरती गेला. त्यावेळी रागाच्या भरात प्रतापराव यांनी तेथे पडलेल्या काठीने मुलगा शरदच्या डोक्यात मारले. घाव वर्मी लागल्याने शरदच्या डोक्यातून रक्त येऊन तो बेशुद्ध पडला. त्यानंतर फिर्यादी सचिन मोहिते यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने शरद याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी प्रतापराव मोहिते याच्यावर कराड ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांना त्याला अटक केली आहे. त्याची दोन दिवसाच्या पोलीस कोठडी रवानगी झाली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.