कराडच्या मुजावर कॉलनीतील स्फोट हा ‘स्फोटकामुळे’ नव्हे!
फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह : कराड पोलिसांकडे अहवाल प्राप्त
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड शहरातील मुजावर कॉलनीत २५ ऑक्टोंबर रोजी शरीफ मुल्ला यांच्या घरात झालेल्या स्फोटाची घटना ही स्फोटक वस्तूमुळे झालेली नाही. कराड शहर पोलिसांना तसा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर ही बाब समोर आली आहे.
कराड शहरात २५ ऑक्टोंबर रोजी शरीफ मुल्ला यांच्या घरात झालेल्या स्फोटात परिसरातील पाच घरांचे व सहा दुचाकींचे नुकसान झाले होते. तसेच तीन घरातील सात जण जखमी झाले होते. या घटनेत शरीफ मुल्ला, त्यांची पत्नी सुलताना मुल्ला या दोघांचे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले होते. स्फोटानंतर फॉरेन्सिक चाचणी पथक बोलवण्यात आले होते. या चाचणी पथकाने घेतलेल्या नमुन्यांची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी झाली असून त्याबाबतचा रिपोर्ट कराड शहर पोलीस ठाण्यात प्राप्त झाला आहे. हा चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आला आहे. त्यामुळे हा स्फोट एखाद्या स्फोटकासारख्या वस्तुमुळे झाला नसल्याचे या अहवालावरून समोर आले आहे. स्फोट गॅस गळतीमुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज त्यावेळी वर्तविण्यात आला होता. हाच अंदाज फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामुळे कायम राहिला आहे.