चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे. या दरम्यान ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामांची सुरक्षा व्यवस्था व ईव्हीएम मध्ये छेडछाड दाखवणारे व्हिडिओ राजकीय पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांच्याकडून समाज माध्यमावर प्रसारित करून टिप्पण्या केल्या जात आहेत. या घटनेची दखल राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने घेतली आहे. या कार्यालयाने अशा व्हिडिओ संदर्भात ‘एक्स’वर स्पष्टीकरण दिले आहे.
त्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने म्हटले आहे की, ” मतदान प्रक्रिया बाधित होत आहे असे दाखवणारे आणि ईव्हीएममध्ये छेडछाड दाखवणारे इतर राज्यांमधील काही जुने व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे प्रसारित केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. असे व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 शी संबंधित नाहीत”, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
तसेच राज्यातील मतदान प्रक्रिया ही संपूर्णपणे शांततेत आणि सुरळीत पार पडली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांनी एक्स अकाउंटवरून केलेल्या टिप्पणीत म्हटले आहे.
काही व्यक्ती निवडणूक प्रक्रियेला बाधा पोहचवणारी कृती करतानाचे, आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न करत असतानाच्या इतर राज्यांमधील जुन्या चित्रफिती समाज माध्यमांवर फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. (१/२)
— ChiefElectoralOffice (@CEO_Maharashtra) May 25, 2024
या चित्रफिती लोकसभा निवडणूक २०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील मतदान प्रक्रियेशी संबंधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली आहे. (२/२)
— ChiefElectoralOffice (@CEO_Maharashtra) May 25, 2024
चार दिवसांपूर्वीच एका पक्षाच्या उमेदवाराने जाहीररीत्या समाज माध्यमावर एक व्हिडिओ प्रसारित करत एकजण त्यांच्या मतदारसंघातील ईव्हीएम यंत्र ठेवलेल्या गोदामात सुरक्षा भेदून प्रवेश करून ईव्हीएम यंत्रासोबत छेडछाड करत असल्याचे म्हटले होते. राज्यात काही ठिकाणी बूथ ताब्यात घेतल्याच्याही चर्चा होत आहेत. काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून सांगितले जात आहे, त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र यावर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एक्स माध्यमावरून स्पष्टीकरण देत राज्यातील निवडणूक प्रक्रिया ही शांततेत व सुरळीत पार पडली असल्याचे म्हटले आहे.