कराड तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा उद्या फैसला
शांततेत 75 टक्के मतदान : उद्या कळणार मतदारांचा कौल
कराड | प्रतिनिधी
कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक सह 12 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज चुरशीने पण शांततेत सरासरी 75 टक्के मतदान झालं. यामध्ये सर्वाधिक 93.22 टक्के मतदान टेंभू गावात तर सर्वात कमी 59.61 टक्के मतदान शेळकेवाडी ( येवती) येथे झाले. मतदानानंतर सीलबंद मतपेट्या येतील प्रशासकीय इमारतीत आणण्यात आल्या आहेत. मतदारांनी कोणाला कौल दिला हे उद्या होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. दरम्यान उद्या मतमोजणी येथील प्रशासकीय इमारतीत होणार असल्याने पोलीस बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला आहे.
कराड तालुक्यात बारा ग्रामपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी गेल्या काही दिवसापासून सुरू होती. त्यामुळे बारा गावात प्रचाराचा धुरळा उडला होता. त्यामध्ये रेठरे बुद्रुक, भोसलेवाडी, बानुगडेवाडी, पिंपरी, शेळकेवाडी, येवती, गोसावीवाडी, येळगाव, येणपे , कांबिरवाडी, सयापुर, टेंभू या गावांचा समावेश आहे. या गावांसाठी आज ( रविवारी) सर्वत्र शांततेत पण चुरशीने मतदान झाले. सरासरी 75 टक्के मतदान झाले. रेठरे बुद्रुक येथील एकूण 9924 मतदारांपैकी 6872 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने 69.25 टक्के मतदान झाले. टेंभू येथे एकूण 2243 मतदारांपैकी 2091 मतदारांनी हक्क बजावल्याने 93.22%, सयापूर येते एकूण तीनशे मतदारांपैकी 249 मतदारांनी हक्क बजावल्याने 83%, येवती येथे 1799 मतदारांमधील 1135 मतदारांनी मतदान केल्याने 63.09%, येणे येथे 742 मतदारांमधील 557 मतदारांनी हक्क बजावल्याने 75.07%, शेळकेवाडी 255 मधील 152 जणांनी हक्क बजावल्याने 59.61%, पिंपरीत 127 मधील 104 मतदारांनी मतदान केल्याने 81.89%, कांबिरवाडीत 704 मधील 647 मतदारांनी मतदान केल्याने 91.90%, हेळगावात एकूण 2216 मतदारांमधील 1786 मतदारांनी मतदान केल्याने 80.60%, गोसावीवाडीत 313 मधील 289 मतदारांनी मतदान केल्याने 92.33%, बानुगडेवाडीत 537 मतदारांमधील 489 जणांनी मतदान केल्याने 91.06% तर भोसलेवाडीत एकूण 842 मतदारांमधील 718 जणांनी मतदान केल्याने 85.27% मतदान झाले.
मतदानानंतर पोलीस बंदोबस्तात सीलबंद मतपेट्या येतील प्रशासकीय इमारतीत आणण्यात आल्या आहेत. उद्या सकाळी प्रशासकीय इमारतीत मतमोजणी होणार असल्याने प्रशासकीय इमारतीला कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, उद्या निवडणुकीचा फैसला होणार असल्याने मतमोजणीकडे बारा गावातील ग्रामस्थांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.