कराडला दिल्ली दरबारी सन्मान मिळवून देणारा स्वच्छता दूत झाला सेवानिवृत्त…! – changbhalanews
Uncategorized

कराडला दिल्ली दरबारी सन्मान मिळवून देणारा स्वच्छता दूत झाला सेवानिवृत्त…!

आरोग्य अभियंता आर. डी. भालदार यांचा मान्यवरांकडून सन्मान

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराडचे 42 वर्ष नगराध्यक्ष पद भूषविणारे दिवंगत आदरणीय पी डी पाटील साहेब यांच्या कार्यकाळात कराड नगरपालिकेत संधी मिळालेल्या स्वच्छतादूताने आपल्या कार्यकर्तॄत्वाने कल्पक योजना राबवत ‘कराडला स्वच्छ सुंदर’ बनवून दिल्ली दरबारी मानाचा पुरस्कार मिळवून दिला. या स्वच्छता दूताचा सेवानिवृत्ती सन्मान सोहळा होत असताना पालिकेतील त्यांच्या कार्यालयातून ते सभागृहापर्यंत सपत्नीक जात असताना नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत कृतज्ञतेची भावना व्यक्त व्यक्त केली. होय! 38 वर्षाच्या अविरत सेवेनंतर कराडच्या स्वच्छता विभागाची धुरा वाहणारे आरोग्य अभियंता आर. डी. भालदार नुकतेच सेवानिवृत्त झाले. यानिमित्त समस्त कराडकरांच्यावतीने पालिकेत अभियंता भालदार यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला.

कराडच्या सर्वांगीण विकासाबरोबर संपूर्ण शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात मोलाचा वाटा बजावणाऱ्या आर डी भालदार यांनी गेली 38 वर्षे निस्वार्थी सेवा बजावून आपले कर्तव्य प्रामाणिक पार पाडल्याचे गौरवोउद्गार यावेळी मान्यवरांनी काढले.

कराड नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य अभियंता आर डी भालदार यांच्यासह अन्य तीन सेवकांच्या सेवानिवृत्ती निमित्त कराड नगरपालिकेच्या सभागृहात विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आरोग्य अभियंता आर. डी. भालदार यांचा सपत्नीक सन्मान मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला. या कार्यक्रमासाठी माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील काका, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, एड. मानसिंगराव पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील, फारुख पटवेकर, सुहास जगताप, घनश्याम पेंढारकर तसेच नगरपरिषदेच्या उपमुख्यधिकारी श्रीमती सुविधा पाटील, लेखापाल मयूर शर्मा, जलनिसारण अभियंता ए आर पवार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, पालिकेचे माजी अभियंता ए एन मुल्ला, कामगार संघटनेचे अध्यक्ष आनंद खवळे, नगरपरिषदेचे वरिष्ठ मुकादम मारुती काटरे यांच्यासह विद्यमान अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोरोना काळात प्रभावी कामगिरी…

कराड नगरपालिकेच्या विविध विभागात काम करत असताना भालदार यांच्या विनम्र सेवेने कराडकरांची त्यांनी मने जिंकली. शहरात येणारी पूर परिस्थिती, कोरोनाच्या वैश्विक संकट काळात मानवतेची दृष्टिकोनातून जीवाची पर्वा न करता सर्व सफाई कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांना प्राथमिक सेवा-सुविधा व साधने देण्याचे चांगले कार्य भालदार यांनी केलेची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

‘स्वच्छ सुंदर कराड’साठी राबवल्या कल्पक योजना…

स्वच्छतेचा महामंत्र बुलंद करणाऱ्या स्वच्छ कराड-सुंदर कराड हे अभियान यशस्वी व्हावे यासाठी ही आर डी भालदार यांनी या अभियानांतर्गत अनेक कल्पक योजना राबविल्या. स्वच्छ भारत अभियानात भालदार यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारत सरकारच्यावतीने राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्म यांच्या हस्ते कराड नगरपरिषदेचा दिल्ली येथे विशेष सन्मान करण्यात आला. हा सन्मान केवळ भालदार यांनी आपल्या टीमला बरोबर घेऊन केलेल्या कामाची पोचपावती असल्याचेही अनेकांनी नमूद केले.

दिवंगत पी डी साहेबांच्या काळात संधी मिळाल्याचे भाग्य…

कराड नगर परिषदेचे सलग 42 वर्ष नगराध्यक्षपद भूषवणारे आदरणीय स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो असे गौरवद्वार सत्कारमूर्ती आर डी भालदार यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने काढले. यावेळी आर डी भालदार यांची कन्या कुमारी आजिमा भालदार व नात कुमारी सफुरा शोएब मुजावर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

समस्त कराडकरांच्यावतीने सन्मान…..

या कार्यक्रमात गेली 38 वर्षाची सेवा करून नगर परिषदेच्या कार्य सेवेतून मुक्त होत असताना अनेक ज्येष्ठ नागरिक , नगरपालिकेचे माजी नगरसेवक, पालिकेचे अधिकारी , कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी आर डी भालदार यांचा सन्मान केला. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे कामगार संघटनेच्यावतीने आनंद खवळे यांनी स्वागत केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन प्रा. माणिक बनकर यांनी केले.

आरोग्य अभियंता आर डी भालदार यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी रामचंद्र यशवंत जाधव, दत्ता मोरे व मिलिंद दिनकर कांबळे हेही आपल्या सेवा कार्यातून आज सेवानिवृत्त झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांचाही सन्मान केला.

आ. बाळासाहेब पाटील यांनीही केला सत्कार…

दरम्यान, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री तथा कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनीही सेवानिवृत्ती निमित्त आरोग्य अभियंता आर डी भालदार यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close