कार्वे नाका खुनाच्या घटनेचं ‘कारण’ समोर
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
शहरातील कार्वेनाका परिसरात शनिवारी दुपारी शुभम रवींद्र चव्हाण (वय २२ या. वडोली निळेश्वर) याच्या गळ्यावर, मानेवर धारदार शस्त्राने खोलवर तब्बल ११ वार झाले. त्यामध्ये मोठा रक्तस्त्राव होऊन शुभमचा मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून खुन्नसच्या कारणावरून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, हल्लेखोराच्या शोधासाठी कराड पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. घटना घडली तेव्हा मृत शुभम याच्यासमवेत असलेल्या त्याच्या दोन मित्रांकडेही पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत व संशयित या दोघांमध्ये खुन्नस दिल्याच्या कारणावरून वाद झाला होता. शनिवारी दुपारी दोन मित्रांसह हा वाद मिटवण्यासाठी शुभम कार्वेनाका चौकात आला होता. त्यापूर्वी त्याचे संशयित हल्लेखोरा बरोबर बोलणे झाले होते. शुभम हा एका मित्रासह दुचाकीवर बसून हल्लेखोरासोबत वादावर चर्चा करत होता. मात्र यावेळी हा वाद मिटण्याऐवजी वाढला, सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर हल्लेखोराने दुचाकीवर बसलेल्या शुभमच्या गळ्यावर, मानेवर धारदार शस्त्राने वार केले. एका मागून एक वार झाल्याने शुभम गंभीर जखमी झाला. यावेळी मोठा रक्तस्त्राव झाला.
रक्ताने माखलेला शुभम जीव वाचवण्यासाठी दुचाकीवरून उतरून सैरावैरा पळत सुटला. मात्र काही अंतरावरच तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हा प्रकार जेथे सुरू झाला, त्या किस्मत इलेक्ट्रॉनिक्ससमोरील जागेपासून ते अर्बन बँकेच्या शाखेसमोरपर्यंत रक्ताचा सडा पडलेला दिसत होता. खोलवर वार झाल्याने शुभमचा जागीच मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
हल्लेखोराने शुभमच्या गळ्यावर, मानेवर तीन बाजूला तीन वार केले आहेत. त्यानंतर जीवाच्या आकांताने गाडीवरून उतरून पळत सुटलेल्या शुभमच्या पोटावर, पाठीवर असे एकूण ११ वार हल्लेखोराने केले, असे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे मोठा रक्तस्त्राव होऊन शुभमचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर किती खोलवर वार झालेत याची वैद्यकीय तपासणी कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात सुरू होती.
शुभम आणि त्याचे मित्र कराडमधील एका कॉलेजचे विद्यार्थी..
शुभम आणि त्याच्यासोबत हल्लेखोराबरोबरच वाद मिटवण्यासाठी सोबत आलेले मित्र हे सर्वजण विद्यानगर मधील एका कॉलेजमध्ये शिकत आहेत.. शुभमची हल्लेखोरासोबत नेमकी खुन्नस कोणत्या कारणावरून होती, याचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी तपास करत आहेत.