लग्नाची वरात पोहचली पोलीस स्टेशनच्या दारात
उंब्रज प्रतिनिधी | रविंद्र वाकडे
उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांना त्यांच्या गोपनीय बातमी दारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पेरले तालुका कराड गावच्या हद्दीत गोपाळ वस्तीमध्ये अल्पवयीन मुलीचे आणि मुलाचे लग्न करणार असल्याचे समजले.
मिळालेल्या माहितीनुसार, पो. कॉ. दिपा पाटील,पो. कॉ.साबळे, फल्ले, पो.हवा.सोरटे,म.पो. कॉ.माने यांची एक टीम तयार करून सदरच्या घटना स्थळी जाऊन खात्री करून कारवाई करण्यास सांगितले होते.पोलिसांची टीम घटना स्थळी पोहचताच नवरा आणि नवरीस तेथून पळवून लावण्यात आले होते.अल्पवयीन नवरा आणि नवरीस ताब्यात घेतले असता दोघांचे ही अंगावरील कपडे हे हळदीने माखलेले होते.तसेच नवरी मुलीच्या आई चे हात हळदीने भरले होते.तसेच नवऱ्या मुलाच्या कपाळाला कागदी फुलांच्या पांढऱ्या मंढावळया बांधलेल्या दिसल्या.त्यामुळे अल्पवयीन नवरा व नवरी यांचा बालविवाह लावण्याच्या तयारीत असलेल्या नितीन भाऊसाहेब मोरे,सुवर्णा नितीन मोरे,दोघे राहणार पेरले,तालुका कराड.तर श्रीमती पिंकी गणपत पवार रा.पुणे हडपसर वैधवाडी,गोपळवाडी पुणे यांच्याविरुद्ध उंब्रज पोलीस स्टेशन मध्ये गु. र.नं.६५५/२०२३ बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००७चे कलम ९,११प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरच्या गुन्हयाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रशांत बधे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे पथक करत आहेत.