खून करून मृतदेह प्रवासी बॅगेत भरला ; कराडच्या एकासह तिघांना अटक व कोठडी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
मामीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या मामाचा त्याच्याच राहत्या घरात मामी, मामाची मुलगी व भाच्याने संगनमत करून गळा आवळून खून करून मृतदेह प्रवासी बँकेत भरून शिराळा येथे टाकून दिला होता. या खुनाचा गुन्हा अवघ्या बारा दिवसात उघडकीस आणून शिराळा पोलीस व सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मृताच्या कराड मधील भाच्याला , त्याच्या मामीला व मामाच्या मुलीला अशी तिघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राजेश वसंतराव जाधव वय ५३ मुळगाव कुंडल सध्या रा. पलुस असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी मृत राजेश जाधव यांचा भाचा देव्या उर्फ देवराज चंद्रकांत शेवाळे व 24 मूळ रा. शेवाळेवाडी ता. कराड, सध्या रा. रुक्मिणीनगर, कराड , मुलगी साक्षी राजेश जाधव (साक्षी विनायक काळुगडे) , पत्नी शोभा राजेश जाधव दोघी रा. पलूस या तिघांना पोलिसांनी अटक केली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.
या घटनेची पोलिसांकडील माहिती अशी, शिराळा येथील बाह्य वळण रस्त्यावरील कापरी फाटा ते सुरले वस्ती दरम्यान असणाऱ्या पुलाजवळ सोमवार, दि. २० मे रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास एका प्रवासी बॅगेत सडलेल्या अवस्थेत नायलॉन दोरीने बांधलेला व सतरंजी मध्ये गुंडाळलेला पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळा पोलिसांना व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला तपासाबाबत सूचना केल्या.
सुतावरून गाठला स्वर्ग…..
घटनास्थळी सडलेल्या अवस्थेतील मृतदेह, व प्रवासी बॅग या वस्तू आढळून आल्या होत्या. त्यामुळे मृताची ओळख पटवण्यासह या खुनाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र पोलिसांनी हात न टेकता प्रवासी बॅग व मयताचे अंगावरील कपडे यावरून बेपत्ता व्यक्तींच्या वर्णनाशी जुळते का याचा शोध सुरू केला. प्रवासी बॅग ज्या कंपनीची आहे, ती कंपनी व ती विक्री केलेले ठिकाण कोठे आहे हे शोधण्यासाठी पोलिसांनी शिराळा, सांगली, कराड, पुणे, कोल्हापुर, सातारा या भागात प्रवासी बॅगा बनवणाऱ्या कंपन्यांकडे चौकशी केली. अनेक विक्रेत्यांकडे चौकशी केली. यामधून काही हाती लागेल की नाही, याबाबत साशंकता होती , पण कोणतीही कसर न ठेवता पोलिसांनी विविध पद्धतीने तपास पुढे नेत सुतावरून स्वर्ग गाठला. पलूस येथून एक प्रवासी बॅग विक्री झाली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच पलुस पोलीस ठाण्यात बेपत्ता म्हणून नोंद असलेल्या राजेश वसंतराव जाधव रा. पलुस यांचे नातेवाईकांकडे पोलिसांनी कसून चौकशी करण्याचा निर्णय घेतला. या चौकशीत नातेवाईकांनी दिलेल्या माहितीत विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी या खुनाची उकल केली. बेपत्ता असलेल्या राजेश जाधव यांचा खून झाल्याचे समोर आले. या खुनात तिघांचा सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी याप्रकरणी मृत राजेश यांचा भाचा देवराज ऊर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे, मुलगी साक्षी राजेश जाधव, पत्नी शोभा राजेश जाधव यांना अटक केली.
चौकशीतून खूनाचे कारण समोर….
मृत राजेश याला दारूचे व्यसन होते. तो पत्नी शोभावर चारित्र्याचा संशय घेऊन मारहाण करत होता. याच कारणातून फेब्रुवारी महीन्यात राजेशचा पलूस येथील राहत्या घरी खून करुन त्याचा मृतदेह प्रवासी बँकेत भरून ही बॅग शिराळा पोलीस ठाणे हद्दीत टाकुन दिली असल्याची माहिती चौकशीतून समोर आली.
…. त्या रात्री घडलं असं….
पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत दारू पिऊन राजेशने सलग तीन दिवस कुटुंबियांशी वाद घातला होता. त्यामुळे रागाने २१ फेब्रुवारी रोजी रात्री राहत्या घरी पत्नी, मुलगी व भाचा यांनी तोंडावर उशी दाबून, गळा आवळून व गळ्यावर वार करून राजेश याचा खून केला. त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी सकाळी मृतदेह बॅगेमध्ये भरून मोटारसायकलवरून भाचा दिव्या शेवाळे याने सदरची प्रवासी बॅग शिराळा येथे आणून टाकली होती. पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत राजेशची पत्नी शोभा हिने स्वतः 28 फेब्रुवारीला पलूस पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची खबर दिली होती. मात्र पोलिसांनी मोठ्या चतुराईने तपास करत या खुनाचा उलगडा केला. याप्रकरणी मूळ शेवाळेवाडी व सध्या कराड येथे राहणाऱ्या देव्या शेवाळे सह तिघांना पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. त्यांना न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस अधीक्षकांकडून तपास पथकाला बक्षीस जाहीर…
पोलीस अधीक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिध्देश्वर जंगम यांच्यासह सतिश शिंदे , हरिषचंद्र गावडे, प्रविण साळुंखे, युवराज सरनोबत, अनिता मेनकर, सिकंदर श्रीवर्धन, जयनाथ चव्हाण, गणेश खराडे, कुमार पाटील, महेश गायकवाड,, कालीदास गावडे, नितीन यादव, संदिप पाटील, शरद जाधव, शरद बावडेकर, प्रशांत देसाई, अमर जाधव, शशिकांत शिंदे, शरद पाटील, राहुल पाटील, सुनिल पाटील, नागराज मांगले यांच्या पोलीस पथकाने अथक परिश्रम घेऊन हा खूनाचा गुन्हा उघडकीस आणला. यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण, शिराळा पोलीस अशा २२ पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, पोलीस अधिक्षक यांनी तपास पथकास उत्कृष्ट तपास केलेबाबत बक्षीस जाहीर केले आहे.