कराडला शुक्रवारी राज्यातील सर्वात मोठी दरबार मिरवणूक शिवजयंती उत्सव 2024 ; महिलांची दुचाकी रॅली व महाआरतीही होणार
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
शहरात प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने पारंपारीक शिवजयंती उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी 8 ते 10 मे दरम्यान शिवजयंती साजरी करण्यात येणार असून कराडच्या शिवजयंतीचे मुख्य आकर्षण असलेली राज्यातील सर्वात मोठी दरबार मिरवणूक शुक्रवार, दि. 10 मे रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष विनायक पावसकर यांनी दिली.
हिंदू एकताच्या पारंपारिक शिवजयंती उत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जिरंगे, जिल्हा कार्याध्यक्ष राहूल यादव, कराड दक्षिणचे अध्यक्ष दिग्वीजय मारे, शहराध्यक्ष प्रकाश जाधव, सुनिल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
पावसकर म्हणाले, कराड शहरात हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येते. यावर्षी बुधवार, दि. 8 रोजी सायंकाळी चावडी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तर गुरूवार, दि. 9 रोजी कराड व मलकापूरसह तालुक्यातील मंडळांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मलकापूर व तालुक्यातील गावागावांत दि. 9 रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने मिरवणुका काढण्यात येणार आहेत. याच दिवशी शहरातील शिवाजी हौसिंग सोसायटी ते कृष्णा घाट दरम्यान महिलांची दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी 4 वाजता महाआरती होणार आहे. तर शुक्रवार, दि. 10 रोजी शहरातून दरबार मिरवणूक काढण्यात येणार आहे.
कराडच्या शिवजयंतीचे मुख्य आकर्षण असलेली दरबार मिरवणूकीस अक्षयतृतीयेच्या दिवशी संध्याकाळी शहरातील कृष्णा नाका येथील पांढरीच्या मारूती मंदिरापासून प्रारंभ होईल. ही दरबार मिरवणूक मंगळवार पेठ, जोतिबा मंदिर, कमानी मारूती मंदिर, चावडी चौक मार्गे मुख्य बाजारपेठेतून दत्त चौकातील शिवतीर्थावरील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर येईल. या मिरवणूकीत पारंपारीक वाद्य, चित्ररथ, घोडेस्वार सहभागी होणार आहेत. शिवजयंतीच्या निमित्ताने संपुर्ण शहरात भगव्या पताका व झालरी लावण्यात येणार आहेत.
दरम्यान, हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या अध्यक्षपदी विक्रम पावसकर यांची निवड करण्यात आली आहे. तर विनायक पावसकर व चंद्रकांत जिरंगे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. सांगलीचे माजी आ. नितीन शिंदे यांची प्रांताध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे पावसकर यांनी सांगितले.
हिंदू एकताचा महायुतीला पाठिंबा…
हिंदू एकता आंदोलन ज्या उद्धीष्ठांनी स्थापन करण्यात आले. त्यातील काही उद्धीष्ठ भारतीय जनता पक्षाने पुर्ण केली आहेत. तर काही उद्धीष्ठ भाजपाच्या अजेंडयावर आहेत. ही उद्धीष्ठ पुर्ण करण्यासाठी हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुतीला पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तळागाळापर्यंत महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी काम करीत आहेत, असे विनायक पावसकर व चंद्रकांत जिरंगे यांनी सांगितले.