भरदिवसा शेतातील वाटेवर एकाचा अज्ञाताकडून गोळ्या झाडून खून ; सांगली जिल्हा हादरला ; कासेगाव येथील घटना – changbhalanews
क्राइम

भरदिवसा शेतातील वाटेवर एकाचा अज्ञाताकडून गोळ्या झाडून खून ; सांगली जिल्हा हादरला ; कासेगाव येथील घटना

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत असून आज (शुक्रवारी) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कासेगाव ते वाटेगाव हद्दीवर शेतात निघालेल्या एकाचा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला. पांडुरंग भगवान शिद (वय४०) रा. कासेगाव असे खून झालेल्याचे नाव आहे. दरम्यान, या घटनेने वाळवा तालुक्यात सह संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील व्यवसायाने शेतकरी असलेले पांडुरंग भगवान शिद (वय ४०) हे त्यांच्या दुचाकीवरून शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कासेगाव व वाटेगाव दरम्यानच्या हद्दीवर असणाऱ्या शेतातील जनावरांच्या शेडकडे जनावरांचे दूध काढण्यासाठी निघाले होते. वाटेत सांजर्बीचा माळ या ठिकाणी त्यांच्यावर अज्ञाताने पिस्तुल्यासाख्या शस्त्राने गोळ्या झाडल्या. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरून पलायन केले.‌

याबाबतची माहिती कासेगाव येथे गावात समजल्यानंतर एकच खळबळ उडाली. कासेगाव पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. शेतात जाणाऱ्या वाटेवर दिवसाढवळ्या पांडुरंग शिद यांचा अज्ञाताकडून खून झाल्याचे समजल्यावर ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी ग्रामस्थांना हटकले.

घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट…

घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांनी भेट देऊन पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या. कासेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी हरिश्चंद्र गावडे, बाजीराव पाटील यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

हल्लेखोराने शिद यांच्यावर झाडल्या चार गोळ्या…

घटनास्थळावर प्रथमदर्शनी पोलिसांनी केलेल्या पाहणीनुसार मयत पांडुरंग शिद यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने चार गोळ्या झाडल्या असल्याचे समजते. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर याबाबतची नेमकी माहिती समोर येणार आहे. हल्लेखोर एक होता की अनेक याबाबत कासेगाव पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

खूनाची उकल करण्याचे पोलिसांपुढे आव्हान…

पांडुरंग शिद हे शेती करत होते. त्यांच्यावर झालेला हल्ला हा कोणत्या कारणावरून झाला, हे अद्याप अस्पष्ट आहे. निर्जन ठिकाणी हा खून करण्यात आल्याने , तसेच हल्लेखोराने या हल्ल्यात पिस्तुलासारखे शस्त्र वापरल्याने या खूनाची उकल करण्याचे मोठे आव्हान कासेगावसह सांगली पोलिसांच्या समोर निर्माण झाले आहे. मृत पांडुरंग शिद यांच्या पश्चात आई , पत्नी , दोन मुले असा परिवार आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close