कराडच्या तहसीलदारांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
दिवाळीनिमित्त भेट घेत दिले कपडे, मिठाई व फराळ साहित्य

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड तालुक्यातील सहा गावातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांची तहसीलदार विजय पवार यांनी भेट घेऊन, त्यांची विचारपूस करत दिवाळीनिमित्त कपडे, मिठाई व फराळ भेट दिली. यानिमित्ताने तहसीलदार विजय पवार यांनी प्रशासनाच्यावतीने शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कराड तालुक्यात शनिवारी, दि. ११ रोजी तहसीलदार विजय पवार यांनी शहीद जवानांच्या वेगवेगळ्या गावांना भेटी दिल्या. रेठरे बुद्रूक गावचे सुपुत्र शहीद वीर जवान सचिन बावडेकर हे वयाच्या आठराव्या वर्षी ऐन तारूण्यात भारतीय सैन्यदला मध्ये भर्ती झाले. “ऑपरेशन रक्षक” मध्ये जम्मू-काश्मीर कुपवाडा येथे आतंकवाद्याविरूध्द लढताना वयाच्या एकविसाव्या वर्षी शहीद झाले होते.
अंतवडी गावचे सुपुत्र शहीद वीर जवान महादेव निकम हे कारगिल युद्धामध्ये शहीद झाले होते. मुंढे गावचे सुपुत्र जवान संदीप सावंत हे ‘ऑपरेशन रक्षक’ जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांशी लढताना शहीद झाले होते.
वडगाव हवेली गावचे सुपुत्र सी.एच. एम. शिवाजी जगताप (कीर्ती चक्र) ‘ऑपरेशन रक्षक”मध्ये शहीद झाले होते. येरवळे गावचे सुपुत्र सुरज यादव हे आसाम नागा बॉर्डर येथे शहीद झाले होते. वसंतगड गावचे सुपुत्र जवान नायब सुभेदार शंकर उकलीकर लेह येथे शहीद झाले होते. या सर्व कराड तालुक्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांची दिवाळीनिमित्त कराडचे तहसीलदार विजय पवार यांनी भेट घेतली. या भेटीत त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
या भेटीत तहसीलदार विजय पवार यांनी प्रशासनाच्यावतीने या शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून त्यांना दिवाळी कपडे, मिठाई व दिवाळी फराळ भेट दिला.
दरम्यान, हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आल्याची भावना सातारा जिल्हावासिय व माजी सैनिकांनी व्यक्त केली आहे.
असे स्तुत्य उपक्रम राबवणेसाठी सैनिक फेडरेशनचे सातारा जिल्हा अध्यक्ष प्रशांत कदम (माजी सैनिक) व सर्व माजी सैनिक प्रयत्न करत आहेत. या प्रसंगी नायब तहसीलदार युवराज पाटील, सुहास जाधव, शशिकांत बावडेकर, प्रविण शिंदे, विजय पाटील, पांडुरंग यादव तसेच माजी सैनिक उपस्थित होते.