वहागाव मधील बेपत्ता मुलीचा ७ तासात शोध घेण्यात तळबीड पोलीसांना यश
पोलिसांनी डोंगरदर्यात शोध घेतला ; पोलीस पाटलांची सतर्कता आली कामी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
तळबीड पोलीस ठाणे हद्दीतील वहागाव ता. कराड येथे झोपडपट्टीत राहणारी व सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक ते बेपत्ता झालेली अकरा वर्षे सहा महिने वयाच्या मुलगी शेजारच्या गावातील पोलीस पाटलाच्या सतर्कतेमुळे सुखरूप मिळवण्यात तळबीड पोलिसांना यश आले. मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर अवघ्या सात तासातच तळबीड पोलिसांनी ही कामगिरी करून दाखवली. यादरम्यान शान पथकासह वहागाव परिसरातील डोंगरदऱ्यातही पोलिसांनी शोध घेतला.
पोलिसांकडील माहिती अशी, वहागाव येथील झोपडपट्टीत एक दाम्पत्य दोन मुली व दोन मुलांसह राहत आहे. दि. १४ सप्टेंबर २०२४ रोजी तांदुळवाडी ता. वाळवा जि. सांगली येथे दोघे पती-पत्नी मजूरीने खोदकाम करण्यासाठी सकाळी ०६.०० वा. चे सुमारास आपली चारही मुले घरात ठेवून गेले होते. सायंकाळी ७.०० वाजता कामावरून परत आल्यावर मुले आजूबाजूला खेळत असतील असे त्यांना वाटले. मात्र रात्री ८.०० वाजलेतरी लहान मुलगी ही घरी न आल्याने त्यांनी मोठ्या मुलीस तिचे बाबत विचारले असता तिने लहान बहीण सायंकाळी ५.०० वाजलेपासून कोठे दिसली नसल्याचे सांगितले. त्यामुळे काळजीत पडलेल्या पती-पत्नी दोघांनी आपल्या ११ वर्षे सहा महिने वयाच्या मुलीचा रात्रभर सर्वत्र शोध घेतला परंतु मुलगी मिळून आली नाही. त्यामुळे सकाळी ११.०० वा. चे सुमारास हे दाम्पत्य या घटनेची तक्रार देण्यास तळबीड पोलीस ठाण्यात गेले.
त्यावेळी तात्काळ तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. किरण भोसले यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस ठाणेस घटनेची गुन्हा रजिस्ट्ररी नोंद घ्यावयास सांगून पोलीस ठाणेकडील स्टापच्या वेगवेगळ्या टीम तयार करून स्वतः तपासाची सुत्रे हातात घेतली . सपोनि भोसले यांनी बेपत्ता मुलीच्या शोधासाठी तपास टीम वेगवेगळ्या हद्दीत रवाना करून स्वतः वहागाव, वहागाव झोपडपट्टी व गावातील व हायवेरोडचे सी.सी.टी.व्ही फुटेज तपासणी तसेच झोपडपट्टीत आजूबाजूचे लोक, दुकानदार तसेच लहान मुलांकडे विचारपूस सुरू केली. यावेळी बेपत्ता मुलगी व तिचा लहान भाऊ यांनी हिने दि.१४ सप्टेंबर २०२४ रोजी सांयकाळी ५.०० वा.चे सुमारास झोपडपट्टीत असणारे किराणा मालाच्या दुकानातून चॉकलेट गोळया नेलेबाबत दुकानदार महिलेकडून सपोनि भोसले यांना माहिती मिळाली. मात्र तपासात कोणतेही धागेदोरे हाती लागत नव्हते, तरीही तळबीड पोलीस ठाणेचे प्रभारी किरण भोसले व त्याच्या टीमने क्षणाचीही उसंत न घेता सातत्याने बेपत्ता मुलगीचा तपास चालू ठेवला होता.
या दरम्यान सातारा पोलीस दलातील शॉन पथक (डॉग स्कॉड) सपोनि भोसले यांनी घटनास्थळी बोलावून घेवून मुलीच्या जुन्या वापरत्या कपडयाचा श्वानास वास दिला असता श्वानाने झोपडपट्टीचे पश्चिमेस असलेल्या डोंगर परिसरात मार्ग दाखविला. त्या ठिकाणी पोलिसांचे पथक व गावातील झोपडपट्टीतील स्थानिक लोक हे शोध घेत असतानाच डोंगर परिसराजवळ एका झुडपात एक म्हशीचे लहान रेडकू मृत अवस्थेत आढळून आले. त्या रेडकाच्या अंगावरील जखमा पाहून त्या कोणत्यातरी जंगली प्राण्याने केल्या असाव्यात असे दिसून आल्याने लगेच वनविभागाच्या पथकाला घटनास्थळी बोलावून घेवून त्या अनुषंगाने तपास करण्यात आला. त्यावेळी परिसरातील लोकांनी दि १४ सप्टेंबरच्या रात्री ११.०० वा चे सुमारास कुत्री भुंकत घरात येवून लपून बसली होती, त्यामुळे बिबट्यासारखा हिंस्र जंगली प्राणी येवून गेला असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूचे झाडाझुडपात तसेच ड्रोन कॅमेराचा वापर करून डोंगराच्या परिसरात बेपत्ता मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तपासकामी रवाना केलेले तपास पथके यांनी रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, हायवेवरील ढाबे, हॉटेल यावर असणारे सी.सी.टी.व्ही फुटेज चेक केल्याचे माहिती कळवली. त्यात काहीएक उपयुक्त माहिती न मिळाल्याने बेपत्ता मुलीचा फोटो पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील यांना त्याचे व्हाट्सअपग्रुपवर पाठविण्यात आला.
आबईचीवाडी पोलीस पाटलांची सतर्कता आली कामी…
दरम्यान, मुलीचा शोध घेत असताना सायंकाळी डोंगराच्या पलीकडे असणारे आबईचीवाडी या गावातील उसतोड मजूराला सदरची मुलगी दिसल्याने त्याने तात्काळ गावातील पोलीस पाटील कमलाकर कोळी यांना सदर मुलीबाबत कळविल्याने त्यांनी त्याठिकाणी जावून मुलीचा फोटो काढून पोलीस पाटील ग्रुपवर शेअर केला. कराड तालुका पोलीस ठाणेस मुलीला हजर केले असता कराड तालुका पोलीस ठाणेचे अंमलदार यांनी तळबीड पोलीस ठाण्यास संपर्क केला असता तीच मुलगी असल्याची खात्री झाल्याने तात्काळ मुलीच्या आई-वडीलांना सोबत घेवून प्रभारी अधिकारी भोसले यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात जावून बेपत्ता मुलीला ताब्यात घेवून तळबीड पोलीस ठाण्यात आणून सुखरूप मुलीचे आई-वडीलांच्या ताब्यात दिली.
पोलीस उपाधीक्षकांकडून पोलीस पाटलांसह तळबीड पोलिसांचा सत्कार…
बेपत्ता मुलीच्या तपासादरम्यान आबईचीवाडीचे पोलीस पाटील कमलाकर कोळी यांनी दाखविलेले कर्तव्यदक्षतेमुळे व तत्परतेमुळे ती बेपत्ता मुलगी पालकाच्या ताब्यात देणेस यश प्राप्त झाल्याने आबईचीवाडीचे पोलीस पाटील कमलाकर कोळी यांचा व तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि किरण भोसले यांचा कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी विशेष सत्कार केला.
असे होते तपास पथक….
तक्रार मिळताच अवघ्या सात तासात बेपत्ता मुलीला शोधून काढण्याची कामगिरी तळबीड पोलीसांनी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडूकर, कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडली. या तपास पथकामध्ये स.पो.नि किरण भोसले व पोउनि मदने, सपोफौ खराडे, हवालदार भोसले, साळुंखे, राठोड, फडतरे, मोरे, विभूते, कुंभार व होमगार्डचे जवान, आबईचीवाडीचे पोलीस पाटील कमलाकर कोळी, वनवासमाचीचे पोलीस पाटील महादेव मंडले यांचा समावेश होता. दरम्यान , या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.