कर चुकविणाऱ्या पवनचक्की कंपन्यांवर कारवाई करा-पालकमंत्री शंभूराज देसाई

चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
पाटण तालुक्यात 1 हजार 62 पवनचक्क्यांची नोंद असून उभारण्यात येणाऱ्या प्रत्येक पवनचक्कीची नोंद कटाक्षाने झालीच पाहिजे याबाबत यंत्रणांनी दक्षता घ्यावी. ग्रामपंचायतीने पवनचक्क्यांचे क्रमांक देवून त्याचे जिओ टँगींग करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
पाटण तालुक्यातील ज्या ग्रामपांचायतीच्या हद्दीमध्ये पवनचक्की उभ्या आहेत त्या संबंधित कंपन्याकडून ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या कराबाबतची आढावा बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, पाटणचे प्रांत सुनील गाडे, महाउर्जाचे महाव्यवस्थापक श्री. शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अर्चना वाघमोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात येणा-या पवनचक्कयांना क्रमांक देण्यात यावेत असे सांगून, पवनचक्की कंपन्यांनी शासनाचा कर चुकवेगिरी करू नये यासाठी उभारण्यात आलेलया पवनचक्क्यामधून किती विद्युत निर्मिती होते याची तपासणी करण्यात यावी, अशा सूचना देवून पालकमंत्री श्री. देसाई यांनी कर थकबाकी असणाऱ्या कंपन्यांना अंतिम नोटीस देवून विहित मुदतीत भरणा न झाल्यास कारवाई करावी व थकबाकी दारांकडून व्याजासह वसुली करण्यात यावी, असेही निर्देश दिले.