
मलकापूर म्हणजे नाविण्यपूर्ण योजना, नाविण्यपूर्ण संकल्पना साकारणारे सर्व संपन्न शहर, मलकापूर म्हणजे गेल्या १५ वर्षापासुन अखंडपणे २४x७ पध्दतीने २४ तास पाणी पुरवठा करणार शहर, मलकापूर म्हणजे आदर्श सोलरसिटी, मलकापूर म्हणजे स्वच्छ व सुंदर शहर, मलकापूर म्हणजे विकासाची प्रयोगशाळा, विकासाचे माहेरघर म्हणजे मलकापूर, हे सारं झालं फक्त आणि फक्त मा. पृथ्वीराजबाबांच्या संकल्पनेतून व कै. भास्कररावजी शिंदे दादा यांच्या प्रेरणेतुन आणि उपनगराध्यक्ष मनोहरभाऊ शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वातून ! आज मनोहरभाऊ यांचा वाढदिवस. त्यानिमित्त…..
२४x७ योजनेबद्दल देशाला मार्गदर्शन करण्याची संधी…
मलकापूर शहराच्या विकासामध्ये माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांचेच नव्हे तर संपूर्ण चव्हाण कुटुंबाचे मोलाचे योगदान आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विकासात्मक दृष्टीकोन असणाऱ्या बाबांनी मलकापूरला नेहमीच प्राधान्यक्रम दिला. दिल्लीमध्ये झालेल्या सेमीनारमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला २४x७ योजनेबद्दल देशाला मार्गदर्शन करण्याची संधी केवळ बाबांच्यामुळे ते केंद्रीयमंत्री असताना प्राप्त झाली. यासाठी मनोहर शिंदेभाऊ यांचेसह बाबांच्या तळागाळातल्या कार्यकर्त्याचे प्रोत्साहन मिळाले. मा. बाबांचे कुटुंब व मनोहर भाऊंचे कुटुंबियांचे पिढीजात कौटुंबिक संबंध अगदी त्यांचे वडिल कै. स्वा. सै. आ. भास्कररावजी शिंदे यांचे पासुनचे. त्याची आजही त्याच जिव्हाळ्याने जपणूक झालेली आहे.
मलकापूरला रोल मॉडेल बनविण्याचं स्वप्न साकार झालं…
देशाच्या राजकारणात एका निष्कलंक, स्वच्छ प्रतिमा, उच्चविद्या विभुषित व्यक्तिमत्वाबरोबर काम करायला मिळणं हे भाऊंचं, माझं भाग्य आहे. मलकापूर शहराला रोल मॉडेल बनविण्याचं स्वप्न केवळ आणि केवळ बाबांच्यामुळे साकार झालं, सन २०१३ मध्ये १७-० झालेली पंचवार्षिक निवडणूक म्हणजे जनतेने बाबांच्यावर व भाऊंच्यावर दाखवलेल्या विश्वासाची पोहोचपावतीच. २००८ साली ग्रामपंचायत बरखास्त करुन २४x७ नळपाणीपुरवठा योजनेच्या उभारणीला सुरुवात केली, यामध्ये खुप अडचणी आल्या, लोकांचे अनेक समज-गैरसमज दूर केले. ते केवळ बाबांच्या दूरदृष्टीच्या सकारात्मक विचार शैलीमुळे. जनतेने या उच्चविद्याविभूषित व्यक्तिमत्वावर व त्यांच्या सामाजिक कार्यावर दाखविलेला हा एक विश्वासच आहे. मा. बाबा यांनी कै. भास्कररावजी शिंदे दादा यांचे कार्य पुढे चालविण्याचे काम व ही जबाबदारी त्यांनी मा. मनोहर भाऊंच्यावर टाकली. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी मनोहर भाऊंना त्यांच्या आशिर्वादामुळे नेहमीच बळ मिळत राहणार आहे.
२४ बाय ७ योजना केंद्रासह अनेक शहरं अन् गावांनी स्विकारली…
आज मलकापूरची ओळख जगाच्या नकाशावर वेगळ्या प्रकारे आहे. सन १९९० नंतर मलकापूर शहराची शीघ्र गतीने झालेली वाढ व भविष्यात होणा-या वाढीचा विचार करून, आज रोजी सुरु असलेली २४x७ नळपाणी पुरवठा योजनेची सुरुवात सन २००१ मध्ये अनेक अडचणींवर मात करून केली. आधुनिक पध्दतीनेे साकारलेल्या या पथदर्शी योजनेतून नागरिकांना स्वच्छ पाणी देण्याबरोबरच, पाणी वापराप्रमाणे बिलींग केल्यामुळे शहरातील नागरिकांना हवे त्यावेळी पाणी मिळू लागले. परिणामी पाणी बचत व वीज बचत होऊन नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत झाली. अशा, एका आदर्श योजनेस आज १० वर्षे पुर्ण होत आहेत. या यशाची देशपातळीवर दखल घेत अशा प्रकारच्या नाविण्य पूर्ण योजनेचा अनेक गावांनी व शहरांनी स्विकार केला आहे. या योजनेच्या अनुभवावरूनच केंद्र शासनाच्या स्मार्टसिटी प्रकल्पात मीटरद्वारे पाणी पुरवठ्याची संकल्पना केंद्र शासनाने समाविष्ट केलेली आहे.
दूरदृष्टीमुळे ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली….
पंधरा वर्षांपूर्वी मलकापूरच्या सभोवती अमर्यादित लोकसंख्येची होणारी वाढ विचारात घेऊन दूरदृष्टी ठेऊन सत्तेमध्ये असतानाही ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायत करण्याचा धाडसी निर्णय दादांनी घेऊन महाराष्ट्रातील मलकापूर ही चौथी नगरपंचायत स्थापन केली. या नगरपंचायतीच्या स्थापनेमध्ये माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) त्याचबरोबर स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांचे मोठे पाठबळ लाभले.
नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर दादांनी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, तसेच ग्रामपंचायतीकडे कार्यरत सर्व गरीब सामान्य कुटुंबातील कर्मचा-यांचा समावेश नगरपंचायतीच्या आकृतिबंधामध्ये करून घेतला.
प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा योजनेचा मुलींना लाभ…
शहरातील मुलींचे शिक्षण व सुरक्षित प्रवास व्हावा म्हणून श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाचा शुभारंभ दिनांक ७ जुलै २०१३ रोजी केला. या आदर्श योजनेंतर्गत मुलींना मोफत पास व स्वतंत्र बस असल्यामुळे दरवर्षी शहरातील अंदाजे ५०० मुली लाभ घेत असून, पालक आपल्या मुलींच्या सुरक्षिततेबाबत निर्धास्त झाले आहेत.
प्रियदर्शिनी योजनेतून ४०० मुलींना ४ कोटींचा लाभ…
सध्याचे मुलींच्या जन्माचे घटते प्रमाण विचारात घेता मलकापूरात जन्मलेल्या मुलीसाठी ” प्रियदर्शनी कन्यारत्न योजना ” दिनांक १९ नोव्हेंबर २०११ पासून सुरू केली. नगरपरिषद व कराड अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात जन्मलेल्या प्रत्येक मुलीस वयाच्या एकविसाव्या वर्षी रुपये १ लाख मिळण्याची सोय केली. शहरातील आतापर्यन्त अंदाजे ४०० मुलींना रुपये ४ कोटी रक्कमेचा लाभ मिळाला आहे.
सोलर सिटी योजनेला ऊर्जा बचतीचा पुरस्कार…
पर्यावरण संवर्धनासाठी अपारंपारीक उर्जा म्हणून शहरात सोलर सीटी योजना प्रकल्प सुरू केला. या योजनेंतर्गत नगारपंचायतीने काही हिस्सा भरून प्रोत्साहन दिले. आज शहरातील हजारावर लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला असून लाभार्थींना घरपट्टीमधे १० टक्के सूट देऊन प्रोत्साहित केले आहे. यासाठी मलकापूर नगरपरिषदेला महाऊर्जा विकास अभिकरण महामंडळाचा ऊर्जा बचतीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
मलकापूर हरित महासीटी कंपोस्ट ब्रँडची निर्मिती…
शहरातील ओला व सुका कचरा वेगळा करून ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण झाले पाहिजे, असा सल्ला दादांनी दिला होता. त्यानुसार नगररिषदेने आज देशातील पहिला “रोटरी मकॅनिकल पध्दतीचा घनकचरा प्रकल्प” यशस्वीपणे सुरू केला आहे. या प्रकल्पातून तयार झालेल्या खताला शासनाकडून “मलकापूर हरित महासीटी कंपोस्ट” ब्रँड असे नावही मिळाले आहे. हा प्रकल्प यशस्वी ठरल्याने स्वर्गीय दादांचे एक स्वप्न पूर्ण झाले आहे.
भुयारी गटर योजना राबवणारं जिल्ह्यातील दुसरं शहर…
अशा अनेक योजनांची यशस्वी अंमलबजावणी झालेनंतर शहरामध्ये भुयारी सांडपाणी प्रक्रिया योजना घेण्याबाबत दादा नेहमी आग्रही होते. त्यांच्या या प्रयत्नाला यश येऊन सन २०१३ मध्ये मलकापूर शहरासाठी ४२ कोटी किंमतीची भुयारी गटार योजना मंजूर झाली. कराड शहरानंतर सातारा जिल्ह्यात भुयारी गटर योजना राबवणारे मलकापूर हे दुसरे शहर व राज्यातील पहिली नगरपरिषद ठरली आहे. घरा-घरातील सांडपाणी जोडणीचे काम सुरु आहे. भविष्यात उघड्यावरील सांडपाण्यापासून होणाऱ्या आजारांपासून नागरिकांना मुक्ती मिळेल, नागरिकांचे आरोग्य उत्तम राहणार आहे. या योजनेत प्रक्रिया केलेल्या पाण्याचा गो-का-क सह. पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातुन शेतीसाठी पुनर्वापर करणे हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवले होते.
स्वमालकीच्या जागेत नगरपरिषदेची वास्तू अंतिम टप्प्यात…
मलकापूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी जागा तत्कालीन ग्रामपंचायतीस व सध्याच्या नगरपरिषदेस मिळण्यासाठी माजी आ. कै. भास्करराव शिंदे दादांनी तब्ब्ल १४ वर्षांपासून सुरु केलेल्या प्रयत्नास यश प्राप्त झाले असून, नगरपरिषदेस एक हेक्टर चौदा गुंठे जागा प्रशासकीय इमारत व अग्निशामक केंद्रासाठी ताब्यात मिळाली आहे. आज या जागेवर, अग्निशामक केंद्र उभारणीचे काम पुर्ण झाले असून, ५० हजार चौरस फुटाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीचे काम सुरु आहे. या इमारतीचे काम अंतीम टप्प्यामध्ये असुन सन २०२४ मध्ये त्या ठिकाणी नगरपरिषदेचे कार्यालय सुरु करणेत येणार आहे.
स्पर्धात्मक शहरात मलकापूरला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार…
तत्कालीन मलकापूर ग्रामपंचायतीचे काळात पुनर्वसित झालेल्या झोपडपट्टीतील कुटुंबांना मुलभूत सुविधेअंतर्गत पिण्याचे पाणी, रस्ते, गटार, संरक्षक भिंत इत्यादि सुविधा तसेच प्रत्येक कुटुंबांना स्वतःचे हक्काचे घर असावे अशी त्यांची इच्छा होती. आज पंतप्रधान आवास योजनेतून झोपडपट्टीमध्ये १००० कुटुंबांना स्वतःचे हक्काचे घर मिळणेचा प्रस्ताव तयार करणेत आला आहे.
मलकापूर नगरपरिषदेने बेस्ट अर्बन लोकल बाॅडी या आस्थापनेअंतर्गत सादर केलेल्या स्पर्धात्मक शहरामध्ये देशातील बहुतांश मोठ्या शहरांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. त्या सर्वांमधून देशात तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मलकापूर नगरपरिषदेस मिळाला आहे. या विभागामध्ये प्रथम क्रमांक चंदिगड, द्वितीय क्रमांक इदौंर शहराला देण्यात आलेला असून, मलकापूर व सुरत या दोन्ही शहरांना तिसऱ्या क्रमाकांचा पुरस्कार विभागून देण्यात आलेला आहे. देशामध्ये चंदिगड व इंदौर या स्वच्छ सर्व्हेक्षणात कायम सातत्य राखणाऱ्या शहरांच्या यादीत मलकापूर नगरपरिषद समाविष्ट झाली असलेने मलकापूर शहराच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सदरचा पुरस्कार विशेषबाब म्हणजे अर्बन लोकल बॉडीज् या घटकांतर्गत प्राप्त झाला असून हे यश मलकापूर नगरपंचायतीत २००९ ते नगरपरिषद २०२३ अंतर्गत काम केलेल्या सर्व पदाधिकारी, नगरसेवक व नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी यांचे आहे.
२४ बाय ७ योजनेच्या विस्ताराला १८.६१ कोटी रक्कमेस शासन मान्यता…
तसेच मलकापूर नगरपरिषद २४x७ नळपाणीपुरवठा योजना ही २०३० साल गृहित धरुन डिझाईन केली होती परंतू मलकापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने सध्याचे अंदाजे ४५००० लोकसंख्येस पाणीपुरवठा करण्यासाठी योजना २० ते २२ तास पंपींग करुन चालविली जात आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा विचार करुन २०५४ ची १ लक्ष ६००० इतकी गृहित धरुन केंद्रशासनाच्या अमृत २.० अभियानाअंतर्गत २४x७ पाणीपुरवठा योजना विस्तार व बळकटीकरणाचा प्रस्ताव दाखल केल्याप्रमाणे त्यास मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) तसेच पालकमंत्री ना. शंभुराज देसाई, आ. सतेज पाटील, आ. विश्वजित कदम, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस उदयसिंह पाटील यांचे विशेष सहकार्यातुन नोव्हेंबर २०२३ मध्ये रक्कम रुपये १८.६१ कोटी रक्कमेस प्रशासकीय मान्यता प्राप्त होऊन शासन निर्णय झाला आहे.
मलकापूरला आता पाण्याप्रमाणे २४ तास स्वयंपाकाचा गॅस मिळणार….
तसेच मलकापूर नगरपरिषद २४x७ नळपाणीपुरवठा योजनेप्रमाणे मलकापूर शहरास सन २०२४ ला २४ तास घरगुती गॅस उपलब्ध होणार आहे. सदरचा गॅस स्फोटक विरहित असुन शहरामध्ये गॅस स्फोटामुळे होणा-या दुर्घटना टाळता येणार आहेत.
भाऊंना जबाबदारी पेलण्यासाठी नेहमीच बळ मिळत राहिल…
आ. पृथ्वीराजबाबा यांनी कै. भास्कररावजी शिंदे दादा यांचे कार्य पुढे चालविण्याचे काम व जबाबदारी मा. मनोहरभाऊ यांच्यावर टाकली आहे. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी भाऊंना त्यांच्या आशिर्वादामुळे नेहमीच बळ मिळत राहिल ही सदिच्छा. वाढदिवसाच्या कोटी-कोटी शुभेच्छा!
– सौ. निलम धनंजय येडगे,
नगराध्यक्षा, मलकापूर नगरपरिषद, जि. सातारा.