कोरोना काळात रुग्णांवर फुकट उपचार केले कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे – आ. पृथ्वीराज चव्हाण
एमआयडीसीचा विस्तार जागे अभावी शक्य नसल्याने कराडला आयटी हब उभारणे हे माझे स्वप्न आहे ; काले येथे झाली महाविकास आघाडीची प्रचार सभा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कोरोना काळात आम्ही रुग्णांवर फुकट उपचार केले, असे कोणी म्हणत असेल तर ते साफ चुकीचं आहे. मी सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून त्यावेळी रुग्णांसाठी मदत मिळाली. पण तुम्ही कोरोना काळाचे मते मागण्यासाठी भांडवल करत आहात, अशी टीका कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधकांवर केली. दरम्यान, कराडच्या एमआयडीसीचा जागे अभावी विस्तार करणे शक्य नाही, त्यामुळे कराडला आयटी हब उभा करून रोजगार निर्मिती करण्याचे माझे पुढचे स्वप्न आहे, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
काले (ता. कराड) येथे रविवारी आयोजित काँग्रेस महाविकास आघाडीच्या भव्य प्रचार सभेत ते बोलत होते. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, अॅ ड. रवींद्र पवार, अॅ ड. प्रतापराव जानुगडे, मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, अजितराव पाटील – चिखलीकर, पैलवान नानासाहेब पाटील, अधिकराव जगताप, नामदेव पाटील, नितीन काशीद, शिवाजीराव मोहिते, अॅ ड. नरेंद्र नांगरे – पाटील, धनंजय थोरात, नितीन थोरात, डॉ. अजित देसाई, वसंतराव पाटील, पांडुरंग पाटील, सर्जेराव गुरव, अॅ ड. शरद पोळ, उदय पाटील, संतोष थोरवडे, गीतांजली थोरात, संजय तडाखे, अक्षय सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे यशवंतराव मोहिते, विलासकाका आणि मी प्रतिनिधीत्व केले आणि आमच्याकडून जनतेच्या विश्वासाला पात्र राहूनच विकासकामे झाली. मी मुख्यमंत्री असताना मतदारसंघाचा कायापालट केला. कराड जिल्हा करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे, यादृष्टीने 1800 कोटी रुपयांची विकासकामे केली . तसेच गेल्या पाच वर्षात 1400 कोटींची विकासकामे करता आली. आपल्या भागात एमआयडीसी आहे पण विस्तार करणे जागेअभावी शक्य होत नाही, त्यामुळे आय टी क्षेत्राकडे वळणे ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून कराडमध्ये आयटी हब उभारून रोजगार निर्मिती करण्याचे माझे आता पुढील स्वप्न आहे, असे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
मी जाहीरनामा समितीचा प्रमुख असल्याने राज्यातील जनतेचा आतील आवाज जाणून घेतला आहे. त्यातून अभिवचने तयार केली आहेत . त्यामध्ये महिला, युवक व शेतकऱ्यांसाठी पाच अभिवचने आम्ही दिली आहेत. त्यासाठी शास्त्रीय व आर्थिक आधार घेतला असून कुठेही शासकीय तिजोरीवर भार न आणता विचारांती हा जाहीरनामा तुमच्यासमोर आणला आहे. त्यामध्ये महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याची व्यवस्था, महिलांना एसटीचा पूर्णतः मोफत प्रवास, शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देणार आहोत. राज्यातील सर्व जनतेला २५ लाखापर्यंत आरोग्याचे मोफत उपचार देणार आहोत. तर पदवीधर युवकांना महिन्याला चार हजार रुपये देण्याचे अभिवचन आम्ही दिले असल्याचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, पाणी योजनांची दहापटीने पाणीपट्टी वाढविण्यात आल्यानंतर आम्ही त्याविरुद्ध लढा देवून ती वसुली थांबवली. कराड दक्षिणच्या डोंगरी भागाचा पाणी प्रश्न महत्त्वाचा आहे. तो सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वारणेचे पाणी बंदिस्त पाईपलाईन करून कराड दक्षिणमध्ये आणण्यात येणार आहे. तशी मागणी आम्ही केली आहे.
अॅ ड. उदयसिंह पाटील म्हणाले, निवडणुकीत कोणी आमिष दाखवतील, त्याला भुलू नका. तुमची – आमची आर्थिक कुचंबणा करून सत्ता आणि पदे भोगणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा. पैलवान नानासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. दिपक तडाखे व राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. वसंतराव पाटील यांनी आभार मानले.
यशवंतराव मोहिते भाऊ यांचाच शेअर्स अजून ट्रान्सफर झाला नाही…
जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप म्हणाले, अतुल भोसले व त्यांच्या कुटुंबाने कृष्णा कारखान्याचे संस्थापक दिवंगत यशवंतराव मोहिते यांचा कारखान्याचा सभासदत्व असणारा शेअर्स त्यांच्या मृत्यूनंतर नातवाच्या नावावर अजूनही ट्रान्स्फर केलेला नाही. तर दुसरीकडे ऊसदर प्रतिटन ४९७ रुपयांनी कमी देवून सभासदांना फसवले आहे. कारखान्याकडे उपपदार्थ निर्मिती असूनही रयत करखान्यापेक्षा कृष्णा कारखान्याने दर कमी का दिला, याचे उत्तर द्यावे.