डॉ. अतुल भोसले, आमदार बाळासाहेब पाटील एकाच मंचावर ; वडगाव हवेलीतील कार्यक्रमाचं निमित्त.. – changbhalanews
राजकिय

डॉ. अतुल भोसले, आमदार बाळासाहेब पाटील एकाच मंचावर ; वडगाव हवेलीतील कार्यक्रमाचं निमित्त..

चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
राज्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. सर्वच पक्षांचे नेते, कार्यकर्ते विधानसभा निवडणूकांच्या तयारीला लागले आहेत. सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि भाजपने नुकतेच एकमेकांच्या विरोधात आंदोलन केले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील आणि कराड दक्षिण भाजपाचे नेते तथा भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य डॉ. अतुल भोसले हे दोन्ही नेते वडगाव हवेली ता. कराड येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आमदार बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मातब्बर नेते व माजी सहकार मंत्री आहेत. कराड उत्तरचे ते गेली पाच टर्म प्रतिनिधित्व करत आहेत. तर डॉक्टर अतुल भोसले हे भाजपाचे राज्य कार्यकारणी सदस्य असून सातारा लोकसभा प्रभारी आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आ. पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा धडाक्यात प्रचार केला होता. तर डॉ. अतुल भोसले यांनी भाजपचे उमेदवार श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांना कराड दक्षिण मधून लीड मिळवून दिली होती. या लोकसभा निवडणुकीचा माहोल अजूनही गरमागरम आहे. या पार्श्वभूमीवर कराड उत्तर आणि दक्षिणच्या परस्पर विरोधी पक्षातील या दोन्ही नेत्यांची एकत्र एकाच मंचावर झालेली भेट जोरदार चर्चेत आली आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांच्या गटाने आ. बाळासाहेब पाटील यांना सहकार्याचा हात दिला होता. त्यामुळे अटीतटीच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांनी विजय मिळवला होता. या मदतीची परतफेड करताना तत्कालीन सहकारमंत्री पदाच्या माध्यमातून आ. बाळासाहेब पाटील यांनी कराड दक्षिण मध्ये डॉक्टर भोसले यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना अनेक गावांमध्ये नवीन विकास सहकारी सोसायट्यांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली होती. त्यामुळे कराड दक्षिण मधील अनेक लहान मोठ्या गावामध्ये आ. बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून नवीन विकास सोसायट्या भाजपच्या भोसले गटाने उभा केल्या आहेत. हा इतिहास लक्षात घेता दोघांमधील मैत्री आजही कायम असल्याची चर्चा वडगाव हवेली येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने कराड तालुक्यात पुन्हा सुरू झाली आहे.

वडगाव हवेली येथे स्व. दिनकरराव शिदोजी जगताप (आप्पा) यांच्या ३२ व्या. स्मृतिदिनानिमित्त य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन जगदीश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास आ. बाळासाहेब पाटील व डॉ. अतुल भोसले या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत उपस्थिती लावली होती. यावेळी दोघांनी स्वर्गीय दिनकरराव जगताप तथा आप्पांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनही केले.

यावेळी स्व. दिनकरराव शिदोजी जगताप प्रतिष्ठान वडगाव हवेली, प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव हवेली, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड व क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास दोन्ही नेत्यांनी भेट दिली.

यावेळी बोलताना आ. बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, , मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरामुळे गरजूंचे आर्थिक व आरोग्याचे हित जपण्याचे कौतुकास्पद कार्य स्व. दिनकरराव शिदोजी जगताप प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येत आहे. स्व. दिनकरराव जगताप (आप्पा) यांचे व स्व.पी.डी.पाटीलसाहेब यांचे जिव्हाळ्याचे संबध होते, त्यांनी परिसरातील जनतेच्या हिताचे सामाजिक कार्य केले, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ असे समाजोपयोगी उपक्रम राबवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. यापुढेही असेच समाजोपयोगी उपक्रम राबवावे , असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. अतुल भोसले यांनीही प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करत सामाजिक उपक्रमांना आपले सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.

याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद खलीपे, यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखामन्याचे संचालक बाजीराव निकम, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. खैरमोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण, नेत्रतज्ज्ञ डॉ.माधुरी भारतीया, लोकनियुक्त सरपंच राजेंद्र जगताप, बाजीराव जगताप, बाळासो पाटील, नितीन पाटील, आनंदराव पाटील, हणमंतराव पाटील, युवराज जाधव, सुरेश पाटील, बंटी जाधव, सुहास थोरात, संदीप कदम, शिवराज जगताप व ग्रामस्थ उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close