
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
आजही बहुजन समाज शिक्षणापासून वंचित राहिला आहे . डोंगरदऱ्या खोऱ्यातील जंगलातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते, हे पुरोगामी महाराष्ट्र राज्याचं दुर्दैव म्हणावं लागेल, असे प्रतिपादन प्रवीण काकडे यांनी केले .
देवाचा डोंगर तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्यावतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व खेळाडूंना काकडे यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ झोरे हे होते.
काकडे पुढे म्हणाले की, अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे वतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना, डोंगरदऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. शतकानुशतके शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजाला अस्मितेची ओळख देण्याचे आणि समतेवर आधारित नव समाजाचे स्वप्न पाहण्यासाठी नवीन पिढीला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आजही डोंगरदऱ्या खोऱ्यातील विद्यार्थी सोयी उपलब्ध नसल्याने पाच ते सहा किलोमीटरच्या पायी चालत जाऊन शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यांच्यावर वनप्राण्यांचे हल्ले होत आहेत. त्यामुळे शिक्षणापासून गोरगरीब वर्ग वंचित राहत आहेत, म्हणून अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट शिक्षणाचे महत्त्व गावोगावी जाऊन पटवून देत असून विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी साहित्य वाटप केले जात आहे. अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने आत्तापर्यंत 4500 च्या पुढे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे या सातही जिल्ह्यातील डोंगरी भागातील जंगलातील विद्यार्थ्यांना सहकार्य केले आहे.
आज शासन विद्यार्थी संख्येचे, पटसंख्या कमी असल्याचे सांगून शाळा बंद करण्याचे षडयंत्र रचत आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हे अशोभनीय आहे, त्यासाठी प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन आम्ही जनजागृती व प्रबोधन करत आहोत. याप्रसंगी विजय गोरे, समीर आखाडे, पांडुरंग बंडगर, पप्पू आखाडे, रविंद्र ढेबे, विकास कोकळे, पांडुरंग कोकळे, दत्ताराम आखाडे, निलेश आखाडे , शांताराम आखाडे , मंगेश आखाडे, राजेंद्र कोकळे , संतोष लुगारे व विद्यार्थी, खेळाडू उपस्थित होते.