
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटाकडे गेल्यानंतर शरद पवार गटात अस्वस्थता पसरली आहे. या गटातून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पक्षाच्या आयटीसीलची प्रदेशाध्यक्ष असलेल्या व सातारा लोकसभेचे दावेदार मानले जाणाऱ्या सारंग पाटील यांनी यासंदर्भात तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय एकतर्फी असून सद्यस्थितीत न्यायाची अपेक्षा ठेवणे अवघड झाले आहे, असे सारंग पाटील यांनी म्हटले आहे.
युवा नेते सारंग पाटील म्हणतात की, हा निर्णय अन्यायकारक, एकतर्फी आहे. सद्यस्थितीत न्यायाची अपेक्षा ठेवणे अवघड झाले आहे. ह्या निर्णयामुळे निराशा आमच्या मनात अजिबात येणार नाही. कारण आमचे नेते आशावादी आहेत. आम्ही संघर्ष करणार. पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील तो आम्ही मानणार. जरी नाव व चिन्ह गेले असले तरी आम्ही लढू. मागे सुद्धा १९९९ ला अशीच वेळ आली होती. तेंव्हा सोशल मिडिया नसताना देखील आम्ही लोकांपर्यंत पोहचलो होतो, लढलो होतो. आत्ताच्या परिस्थितीत नाव व चिन्ह पोहचवणे सहज शक्य आहे. यामुळे लोकांच्या सहानुभूतीतीत आणखी वाढ होईल. शेवटी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असेल, असेही सारंग पाटील यांनी म्हटले आहे.