
कराड प्रतिनिधी, दि. ८ जुलै | चांगभलं वृत्तसेवा
माजी केंद्रीय मंत्री स्व. आनंदराव चव्हाण आणि माजी खासदार स्व. प्रेमलाताई चव्हाण (काकी) या राजकारणातील आदर्शवत दाम्पत्याच्या स्मृतिदिनानिमित्त कराडमध्ये अभिवादन कार्यक्रम पार पडला. ८ जुलै रोजी या दोघांचाही स्मृतिदिन असल्याने प्रत्येक वर्षी या दिवशी त्यांच्या कार्याला उजाळा देत अनेक उपक्रम राबवले जातात.
या स्मृतिदिनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी कराड दक्षिण व सातारा जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. दाजीसाहेब व काकींच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की,
“आज माझ्या आई-वडिलांचा स्मृतिदिन… योगायोगाने एकाच दिवशी दोघांचा स्मृतिदिन असतो. माझे वडील स्व. दाजीसाहेब हे निष्णात वकील होते. त्यांनी तीनदा कराडमधून लोकसभेवर निवडून येऊन पंडित नेहरू, शास्त्रीजी व इंदिराजी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्य केले. माझ्या आई स्व. प्रेमलाकाकी यांनी त्यांच्या निधनानंतर खासदार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षा म्हणून काम पाहिले. मिळालेल्या सत्तेचा उपयोग जनतेसाठी करावा, हाच त्यांचा मूलमंत्र होता.”
स्व. आनंदराव चव्हाण यांनी “कसेल त्याची जमीन” या भूमिहक्काच्या मुद्द्यावर ७५ वर्षांपूर्वी प्रश्न उपस्थित करून शेतीविषयक मूलभूत विचार मांडले होते. त्यांच्या विचारधारेचा प्रभाव आजही जाणवतो. त्यांच्या विचारातूनच तो कायदा अस्तित्वात आला होता, हे विशेष.
या कार्यक्रमाला काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह युवा कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. चव्हाण कुटुंबीयांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजकारण व लोकसेवा करण्याचा निर्धार या निमित्ताने पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आला.