रेल्वे लाईन-हायवे ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा द्या – भटक्या विमुक्त गोपाळ समाज संघटनेची मागणी

कराड, दि. १० | चांगभलं वृत्तसेवा
कराड दक्षिण मतदारसंघातील सदगुरू प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आणि कृष्णा माध्यमिक विद्यालय (शेरे) येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी भटक्या विमुक्त गोपाळ समाज सामाजिक संघटनेने केली आहे.
संजयनगर बेघर वसाहतीतील विद्यार्थी दररोज शेणोली स्टेशनजवळील डबल रेल्वे लाईन आणि कराड–तासगाव हायवे ओलांडून शाळेत जातात. वारंवार रेल्वेची ये-जा आणि वेगवान वाहनांची वाहतूक यामुळे त्यांचा प्रवास जीव धोक्यात घालून करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर संघटनेने तहसीलदार, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी आणि शाळा व्यवस्थापकांना निवेदन सादर करून तातडीने मिनीबस किंवा इतर वाहतूक सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली. अन्यथा अपघात झाल्यास शाळा जबाबदार राहतील आणि तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष सुदामराव जाधव यांनी दिला.
निवेदनावेळी अजित जाधव, सचिन साळुंखे, सचिन चव्हाण, विलास जाधव यांसह पदाधिकारी उपस्थित होते.