भाजपच्या गोटात खळबळ; सुनील पाटलांनी सोडली साथ, अजितदादांचा मास्टरस्ट्रोक?

कराड दि. २४, हैबत आडके | चांगभलं वृत्तसेवा
साताऱ्याच्या राजकीय पटलावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने पुन्हा एकदा आपली धमक दाखवत भाजपला मोठा धक्का दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हाध्यक्ष व कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या गोटातील प्रभावी नेता आणि कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील हे आज रविवारी (दि. 24 ऑगस्ट) दहिवडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
या प्रवेशामुळे केवळ भाजपच्या गोटात खळबळ माजली नसून, काँग्रेसच्या पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कराड दक्षिणमधील राजकीय समीकरणातही उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.
भाजपला थेट धक्का…
माजी आमदार आनंदराव पाटील हे भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार डॉ. अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांनी गत विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची साथ सोडून भाजपकडे झुकते माप दिले होते. त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे सुनील पाटीलही होते. मात्र, अलीकडील घडामोडींनंतर सुनील पाटील यांनी काकांपासून दुरावत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या राष्ट्रवादीची वाट निवडली आहे. यामुळे डॉ. भोसले यांच्या गोटातील एक मजबूत आधारस्तंभ ढासळला आहे.
राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याचा डाव…
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांनी आक्रमक मोर्चेबांधणी केली आहे. नुकतेच अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना राष्ट्रवादीत आणण्यात त्यांनी यश मिळवले होते. आता सुनील पाटील यांच्या प्रवेशामुळे कराड दक्षिणमधील राजकीय पटलावरील दोन प्रभावी पाटील घराणी राष्ट्रवादीत सामील होत आहेत. हे अजित पवारांच्या डावपेचाचे मोठे यश मानले जात आहे.
काँग्रेसची पकडही सैल….
कराड दक्षिण हा पारंपरिकदृष्ट्या काँग्रेसचा गड मानला जातो. मात्र, एकामागोमाग काँग्रेसच्या गोटातील नेते भाजप व राष्ट्रवादीकडे वळल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पकड सैल होत असल्याचे दिसत आहे. जुन्या नेत्यांना परत पक्षाकडे खेचण्याचा, आणि इतर पक्षातील नवीन नेत्यांना पक्षाकडे वळविण्याचा काँग्रेसचा मनसुभा या घडामोडीमुळे फारसा यशस्वी होताना दिसत नाही. त्यामुळे भाजपला धक्का देतानाच राष्ट्रवादीने काँग्रेसलाही अप्रत्यक्षपणे हादरा दिल्याचे समोर येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर परिणाम…
या प्रवेशामुळे साताऱ्यातील आगामी निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे आमूलाग्र बदलण्याची शक्यता आहे. भाजपच्या संघटनात्मक शक्तीला तडा गेला असून, राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. काँग्रेसची घसरती पकड लक्षात घेतल्यास, “भाजपला धक्का, काँग्रेसला धास्ती, आणि राष्ट्रवादीला नवी ऊर्जा“ असे समीकरण समोर येत आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, अजित पवार यांची शैली ही प्रतिस्पर्ध्यांच्या गोटातील नाराजांना गळाला लावून संघटन विस्तारण्याची आहे. साताऱ्यात हीच रणनीती अचूकपणे कार्यरत असल्याचे दिसत आहे.