लिंगायतांच्या सामाजिक, राजकीय हक्कासाठी परिषदेचे आयोजन

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात आज १ कोटींच्या घरात लिंगायत समाज आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या ८ टक्के आपण आहोत. पण त्या प्रमाणात सत्तेत आपल्याला भागीदारी मिळत नाही. लिंगायत समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळाल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत. या साऱ्या बाबत भूमिका ठरविण्यासाठी २१ व २२ सप्टेंबर ला लातुर येथे लिंगायत हक्क परिषदेचे आयोजन केले आहे. त्याला सातारा जिल्ह्यातील लिंगायत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन लिंगायत समाजाचे नेते व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केले.
कराड येथे सातारा जिल्ह्यातील लिंगायत समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. त्यात कोयटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कराडचे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार बटाणे होते. तर प्रदीप वाले, सागर कस्तुरे, श्रीनिवास कांबळे, नानासाहेब कस्तुरे यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
कोयटे म्हणाले, लिंगायत समाजाने गेल्या १० वर्षात आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारकडे अनेकदा निवेदने दिली व मोर्चेही काढले. पण त्यांच्या हाती फारसे काही लागलेले दिसत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
राजीव खलीपे यांनी प्रास्ताविक केले. राजू शेटे, दत्तात्रय तारळेकर, गुरुदत्त कचरे, दीपक चिंगळे, सुनील महाजन आदींनी उपस्थितांचे स्वागत केले. तात्या शेटे यांनी आभार मानले.