कराड पोलिसांची दुहेरी कामगिरी! घरफोडीचे ६ गुन्हे उघड, १४ लाख ८० हजारांचे सोन्याचे दागिने व १२ लाख २० हजारांचे ५१ मोबाईल हस्तगत

कराड प्रतिनिधी, दि. १४ | चांगभलं वृत्तसेवा
कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि डी.बी. पथकाने मिळून अवघ्या काही दिवसांत दोन मोठ्या कारवाया करत तब्बल २७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून चांगलीच धडाकेबाज कामगिरी केली आहे.
घरफोडी प्रकरणात सोन्याचा मोठा माल जप्त…
फेब्रुवारी ते जुलै २०२५ या काळात मलकापूर, कोयना वसाहत आणि कार्वेनाका परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या घरफोड्यांच्या ५ गुन्ह्यांचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेने हाती घेतला होता. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे पथकाने मलकापूर येथून यशवंत प्रकाश काटवटे (रा. आगाशिवनगर झोपडपट्टी, मलकापूर, ता. कराड) या संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या अल्पवयीन मुलीसोबत मिळून घरफोड्या केल्याची कबुली दिली.
त्याच्याकडून सुमारे १८.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, किंमत अंदाजे १४ लाख ८० हजार रुपये, जप्त करण्यात आले. अल्पवयीन मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून, संशयित आरोपीकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गहाळ मोबाईल शोध मोहिमेत यश….
याच कालावधीत कराड शहर डी.बी. पथकाने नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून देण्यासाठी विशेष मोहीम राबवली. सीईआयआर पोर्टल आणि इतर तांत्रिक पद्धतींचा वापर करून सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई तसेच कर्नाटक आणि राजस्थान राज्यांत शोधमोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत १२ लाख २० हजार रुपये किमतीचे एकूण ५१ स्मार्टफोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले.
यशस्वी पथके व मार्गदर्शन….
या दुहेरी मोहिमांचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग श्रीमती राजश्री पाटील, तसेच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु ताशिलदार यांनी केले.
तपास करणारे गुन्हे प्रकटीकरण शाखा पथक….
सहायक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, महिला पोलीस श्रध्दा आंबले, तब्बसुम शादीवान, पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार, निखिल मगदुम, हवालदार संदीप कुंभार, संतोष पाडळे, सज्जन जगताप, अनिल स्वामी, धिरज कोरडे, संग्राम पाटील, आनंदा जाधव, अमोल देशमुख, दिग्वीजय सांडगे, मोहसिन मोमीन, मुकेश मोरे, प्रशांत वाघमारे, महेश पवार, सोनाली पिसाळ यांचा तपास करणाऱ्या पथकात समावेश होता.
डी.बी. पथक व सायबर पोलीस…
पो.कॉ. महेश पवार (सातारा सायबर पोलीस) यांच्यासह कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी सायबर तपास यशस्वीरित्या पूर्ण करत या कारवाया केल्या.
कराड पोलिसांच्या या संयुक्त धडाकेबाज कारवायांमुळे कराड परिसरातील गुन्हेगारीला आळा बसणारा असून पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे. अशा मोहिमा पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.