अंबवडे येथे किराणा दुकानाच्या कृतीयुक्त अनुभवने आनंददायी शनिवार साजरा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबवडे ता. कराड या ठिकाणी आनंददायी शनिवार विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. किराणा दुकानातील खरेदी विक्री हा अनुभव या ठिकाणी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना देण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना वजने मापे, नाणी नोटा, धान्य, कडधान्य त्यांचे उपयोग याचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले. अनुभवातून शिक्षण देण्याची किमया वर्गशिक्षक श्रेया माळी व मुख्याध्यापक जयवंत गरुड हे साकारीत आहेत.
सातारा जिल्हा परिषदेने संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी आनंददायी शनिवार हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना दप्तराविना शिक्षण देण्याची अभिनव संकल्पना राबवण्यात येत आहे. शाळांमध्ये या दिवशी विविध उपक्रम राबवले जातात. अंबवडे ही कोळे केंद्रातील उपक्रमशील शाळा आहे.विविध उपक्रम राबवून नवनवीन गोष्टींचे ज्ञान देण्यासाठी या शाळेत नेहमी प्रयत्न केले जात असतात.शालेय पोषण आहार साहित्यामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामधून व शासनातर्फे मिळालेल्या जादुई पिटारा या शैक्षणिक साहित्य पेटीतील साहित्य वापरून येथे शनिवारी किराणा दुकान थाटले होते. सर्व विद्यार्थ्यांना ग्राहक व दुकानदार हे दोन्ही किरदार निभावण्याची संधी मिळत होती. त्यामुळे किराणा दुकाना बरोबरच गणित, विज्ञान,शेती,संभाषणकौशल्य या विषयांचा प्रत्यक्ष अनुभव दिला जात होता. वर्गशिक्षक श्रेया माळी व मुख्याध्यापक जयवंत गरुड यांच्या या अभिनव उपक्रमांचे संपूर्ण तालुक्यात कौतुक केले जात आहे. त्यांना शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष धनाजी शेवाळे व सर्व सदस्य यांची अप्रतिम सहकार्य लाभत आहे उपक्रमशील शाळा म्हणून या शाळेचा नावलौकिक सर्वत्र होत आहे.