कोरोनाच्या काळात या भागातील लोकप्रतिनिधी काय करत होते- भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सवाल
डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ ओंड येथे झाला महिला मेळावा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटात डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासारखा भाऊ लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा राहिला. त्यांनी कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून या भागातील महिला आणि संपूर्ण जनतेची सेवा केली. मात्र कोरोनाच्या या काळात या भागातील लोकप्रतिनिधी नेमके काय करत होते, असा सवाल भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. ओंड (ता. कराड) येथे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित महिला संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला निवडणुकीचा जुमला म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी हिणवल्याचा आरोप करत त्यांनी आ. चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली.
या मेळाव्याला उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले, सौ. उत्तरा भोसले, सौ. गौरवी भोसले, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ. स्वाती पिसाळ, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉ. सुरभी भोसले, कराडच्या माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होत्या.
महाविकास आघाडीचे नेते रेटून खोटे बोलतात. गोरगरीब, आदिवासींचे आरक्षण रद्द केले जाणार असल्याची त्यांनी भीती दाखवली, अशी टीका करून सौ. चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, देशात काँग्रेस ७० वर्षे सत्तेत होती. पण त्यांनी महिलांसाठी काय केले? याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उज्वला योजना, जनधन योजना, मोफत धान्य, लखपती दीदी योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या.
महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना आणली. मात्र सावत्र भाऊ कोर्टात गेले. त्यांनी योजना बंद पाडण्याचा खटाटोप सुरू केला. तसेच या योजनेसाठी सरकारी तिजोरीत पैसा नसल्याच्या अफवा पसरवल्या. तेवढ्यावर न थांबता महिलांना पैशांची लाच देऊ नका, अशी भाषा वापरली. अशा सावत्र भावांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवावी लागेल. त्यासाठीच या मतदारसंघातील सर्व लाडक्या बहिणींनी अतुलबाबांच्या पाठीशी उभे राहून त्यांना विजयी करावे, असे आवाहनही सौ. वाघ यांनी केले.
डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे आपण कराडच्या एमआयडीसीला फाईव्ह स्टारचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. त्याबद्दल ते सकारात्मकत आहेत. त्यामुळे या भागात लवकरच मोठे उद्योग येतील. त्यातून कराड दक्षिणसह तालुक्यातील अनेक महिलांच्या हाताला रोजगार मिळण्यास मदत होईल. आपला लाडका भाऊ, मुलगा म्हणून आपण मला मतदान करून आशीर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डॉ. सुरभी भोसले म्हणाल्या, कोरोनाच्या काळात कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुलबाबा भोसले यांनी माता भगिनींची आणि गोरगरीब जनतेची सेवा केली. कराडला पाणीटंचाई निर्माण झाल्यावर कराडकरांच्या मदतीसाठी डॉ. अतुलबाबा धावले. आता त्यांना साथ देण्याची आपली वेळ आहे.
डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कराड दक्षिण मधील लाडक्या बहिणींना, तसेच बांधकाम कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देता आला आहे. त्यामुळे अतुलबाबांना आपण भाऊबीजेची भेट म्हणून विधानसभेत पाठवूया, असे आवाहन कराडच्या माजी नगराध्यक्ष सौ. रोहिणी शिंदे यांनी महिलांना केले.
याप्रसंगी माजी जि. प. सदस्या सौ. श्यामबाला घोडके, शिवसेनेच्या सुलोचना पवार, डॉ. सारिका गावडे, कविता कचरे, प्रा. डॉ. स्नेहल राजहंस यांच्यासह महिला उपस्थित होत्या.