कराड विमानतळ विस्तारासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळेच निधी – नामदेवराव पाटील

कराड प्रतिनिधी, दि. ११ | चांगभलं वृत्तसेवा
स्व. यशवंतराव चव्हाण यांचे स्वप्न होते की प्रत्येक तालुकास्तरावर विमानतळ असावे. त्यानुसार कराड येथे विमानतळाची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर कराडचे सुपुत्र आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात कराडसाठी विशेष निधीची तरतूद केली. यावेळी भविष्यातील गरज लक्षात घेऊन विमानतळ विस्ताराचे नियोजनही करण्यात आले.
माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी विमानतळ विस्तारासाठी सर्व प्रशासकीय परवानग्या मिळवून निधी मंजुरीपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. ४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन आदेशानुसार, २८ ऑगस्ट २०१२ च्या शासन निर्णयान्वये विमानतळ विस्तारीकरणासाठी ९५.६४ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर २९ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये २२१.५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.
शासन आदेशात नमूद केल्याप्रमाणे, भैरवनाथ पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनचे वळतीकरण करण्यासाठी ८.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तसेच या योजनेच्या पाइपलाइन स्थलांतराकरिता १७.१६ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. विमानतळ बाधितांना मोबदला आणि पुनर्वसन, तसेच भैरवनाथ पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइन स्थलांतर या विषयावर २० जुलै २०२४ रोजी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही झाली होती.
नामदेवराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले की, कराड विमानतळ विस्तारीकरण हे पृथ्वीराज चव्हाण यांचे ड्रीम प्रोजेक्ट असून, त्यांच्या दूरदृष्टीमुळे हा उपक्रम साकार होत आहे. या विकासकामावर कोणताही श्रेयवाद न करता कराड दक्षिणची गरिमा राखली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.