कराड शहरासह तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस
वाऱ्याचा प्रचंड वेग ; घरांचे पत्रे उडाले ; उभी पिके आडवी झाली

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड शहरासह तालुक्यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला. शहरात सुमारे तासभर पाऊस पडला. तर तालुक्याच्या ग्रामीण भागात ही ठीक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने काही घरावरचे तसेच जनावरांच्या शेडवरचे पत्रे उडाले. काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले.
कराड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाचे आगमन झाले. कराड शहरात जोरदार वारे वाहिले. विजा चमकत होत्या. ढगांनी गडगडाट केला आणि काही वेळातच मुसळधार पावसाचे आगमन झाले. तरीही शहरातील विद्युत पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला नव्हता. शहरात सर्व रस्त्यावर पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. कामावरून घराकडे परतणाऱ्या लोकांचे हाल झाले.
कराड तालुक्यात ग्रामीण भागात सोमवारी तासवडे एमआयडीसी परिसरात पावसाने जोरदार तडाखा दिला होता. त्यामध्ये वीज वाहक तारा तुटल्या होत्या, विजेचे खांब तुटले. घरांचे पत्रे उडाले, मोठे नुकसान झाले होते. मंगळवारी सायंकाळी पुन्हा तालुक्याच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी बरसला. यामध्ये दक्षिणेतील मलकापूर, नांदलापूर, वाठार, बेलवडे बुद्रुक, रेठरे परिसरात पाऊस बरसला. जोरदार वारे वाहिल्याने बेलवडे बुद्रुक येथे पोल्ट्री शेड वरील पत्रे उडून गेले. ठीक ठिकाणी उसाच्या शेतीचे नुकसान झाले. उभी उसाची पिके वाऱ्यामुळे आडवी झाली.
नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी…
कराड तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पावसामुळे मोठ्या नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे महसुलाधिकाऱ्यांनी तातडीने करावे तसेच आपत्तीग्रस्तांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी , अशी मागणी तालुक्यातील नागरिकातून होत आहे.