चोर समजून…. पोतराज कलावंतांना जबर मारहाण ; कुठे घडला प्रकार..,

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सातारा , सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात एखादी-दुसरी चोरीची घटना घडत असताना अफवांचे पीकही जोरात सुरू आहे. त्यामुळे गावात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे संशयाने पाहिले जात आहे. गावोगावी उदरनिर्वाहासाठी भटकणाऱ्या भटक्या समाजातील लोकांच्यासमोर यामुळे मोठीच समस्या निर्माण झाली आहे. ‘चोर सोडून संन्याशाला…’ असे काहीसे प्रकार घडू लागले आहेत. कडेगाव तालुक्यातील आंबेगाव येथेही शनिवार दि. २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेसातच्या सुमारास कार्यक्रम करून परतणाऱ्या प्रबोधनकार पोतराज कलावंतांना काही अज्ञातांनी चोर समजून बेदम मारहाण केली. या घटनेत पोतराज कलावंत संदीप विठ्ठल पवार व त्यांचे सहकारी कलावंत जखमी झाले आहेत.
दरम्यान, पोतराज कलावंतांना झालेल्या या मारहाणीचा समाजातील सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कलाकार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष सुनीलभाऊ तोरणे यांनी यासंदर्भात चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना भेटून कारवाईची मागणी केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन आरपीआय (आठवले) कलाकार संघटनेच्यावतीने पोलिसांना देण्यात आले आहे.
या घटनेचे हकीगत अशी, पोतराज कलावंत संदीप विठ्ठल पवार व त्यांचे सहकारी कलावंत (रा. येतगाव ता.कडेगाव जि.सांगली ) हे सर्वजण ‘पोतराज गीतांचा’ कार्यक्रम करून शनिवारी सायंकाळी घराकडे परतत होते. यावेळी आंबेगाव ता. कडेगाव जि. सांगली या ठिकाणी काही अज्ञात हल्लेखोरांनी ‘चोर’ समजून पोतराज कलावंत संदीप पवार व त्यांच्या सहकारी कलावंतांना जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये पवार व त्यांचे सहकारी जखमी झाले. ‘आम्ही पोतराज कलावंत आहोत, मारहाण करू नका, आम्ही कार्यक्रम करून परत घराकडे निघालो आहोत.’ असे सर्व पोतराज कलावंत त्यावेळी मारहाण करणाऱ्या अज्ञात लोकांना सांगत होते. मात्र त्यांचे काहीही न ऐकता अज्ञातांनी त्यांना जबर मारहाण केली.
दरम्यान, या घटनेची माहिती समजताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कलाकार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष सुनिलभाऊ तोरणे यांनी तातडीने मारहाणीत जखमी झालेल्या पोतराज कलावंतांना व इतर कलाकारांनासोबत घेऊन चिंचणी-वांगी पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलिसांना घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती देऊन तक्रार दाखल करण्यात आली. सुनीलभाऊ तोरणे यांनी या घडलेल्या प्रकाराबाबत पोलीस उपनिरीक्षक शेलार यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून कारवाईची मागणी केली. कलाकार संघटनेच्यावतीने अज्ञात हल्लेखोरांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलिसांना देण्यात आले.
पोलिसांनी कठोर कारवाई करावी….
चोरीच्या घटना रोखण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस सतर्क आहेत. गाव पातळीवरचे ‘पोलीस पाटील’ ही अलर्ट आहेत. अशा परिस्थितीत एखादी संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास त्याबाबत अगोदर पोलिसांना कळवणे गरजेचे आहे. मात्र लोकं स्वतःच कायदा हातात घेऊन विचारपूस न करता अमानुषपणे बेदम मारहाण करत आहेत. अशा घटनांमध्ये एखाद्या निरापराधाचा जीव जाऊ शकतो. चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हल्लेखोरांच्यावर कठोरात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात घडणाऱ्या अशा घटना टाळता येतील.