सातारा जिल्ह्यात दहीहंडी, गणेशोत्सवात लेझरबिम लाईटवर बंदी; कलम 163 लागू 🚫

सातारा प्रतिनिधी, दि १४ | चांगभलं वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यातील आगामी गोकुळअष्टमी, दहिहंडी, गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुका, तसेच गणेशोत्सवातील कार्यक्रमांदरम्यान प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईट आणि प्रेशरमिडच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी 8 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत लागू राहणार असून, यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, अशा लाईट्स व उपकरणांमुळे श्रवणयंत्र, डोळे आणि हृदयास हानी पोहोचण्याची शक्यता असून, रस्त्यावर वाहन चालवताना चालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचा धोका वाढतो. तसेच यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
म्हणूनच, या कालावधीत मिरवणुका, सार्वजनिक कार्यक्रम, रस्ते किंवा इतर ठिकाणी कोणत्याही व्यक्ती, संस्था, गणेश मंडळे किंवा आयोजक यांनी अशा उपकरणांचा वापर करू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचेही पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.