मतचोरीवरून भाजप–काॅंग्रेसमध्ये वार-पलटवार; पृथ्वीराज चव्हाण कुटुंबावर भाजपचा आरोप – इंद्रजीत चव्हाण यांचेकडून खंडन

कराड, दि. २२ │ चांगभलं वृत्तसेवा
कराड दक्षिणेत मतचोरीच्या आरोप–प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दुबार-तिबार मतदार नोंदणी केली असून त्यांनी दुबार मतदान केल्याचा खळबळजनक आरोप भाजपाचे कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी केला.
यावर भाजपाचे कराड तालुका अध्यक्ष पै. धनाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “कराड पाटण कॉलनीत पृथ्वीराज चव्हाण यांचे निवासस्थान असून त्याच पत्त्यावर १५ नावे आहेत. अनेकजण प्रत्यक्षात या ठिकाणी राहत नाहीत. त्यापैकी नऊ जणांची दुबार नावे असून त्यांची नोंद कराड दक्षिणसह पाटण मतदारसंघात आहे.”
भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे की, “याच दुबार नोंदींवर पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१४ आणि २०१९ च्या निवडणुका जिंकल्या.”
काँग्रेसकडून आरोपांचे खंडन….
दरम्यान, या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “मी व माझ्या कुटुंबातील सदस्यांनी एकाच ठिकाणी मतदान केले आहे. दुबार नावांची नोंद आणि बोगस मतदान यात स्पष्ट फरक आहे. दुबार नाव वगळण्यासाठी आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे वेळेवर अर्ज केले होते, मात्र नावे वगळली गेली नाहीत. ही चूक आमची नसून निवडणूक आयोगाची आहे. कराड दक्षिणमध्ये झालेल्या मतचोरीचा घोटाळा झाकण्यासाठी भाजपाकडून हे आरोप होत आहेत.”
काँग्रेसची बाजू मांडताना, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अजित पाटील–चिखलीकर यांनी भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “रेठरे परिसरात ‘शर्मा, वर्मा’ अशी आडनावे मतदार यादीत कशी आली, याचे उत्तर आमदार अतुल भोसले देऊ शकत नाहीत. म्हणूनच प्रवक्ते नेमून आरोपांची मालिका सुरु केली आहे.”
यावेळी उपस्थित असलेल्या गजानन आवळकर यांनीही प्रतिक्रिया देत, “माझे मूळ गाव वाठार असून मी राहायला कराड येथे आहे. या संदर्भात निवडणूक आयोगासमोर सर्व कागदोपत्री पुरावे दाखल केले आहेत. तरीदेखील माझे नाव दोन ठिकाणी दिसत असेल तर ती आयोगाचीच चूक आहे. भाजप पदाधिकाऱ्यांचे आरोप निरर्थक आहेत,” असे सांगून स्वतःवरील आरोपांचे त्यांनी खंडन केले.
मतचोरीच्या मुद्द्यावरून भाजप व काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले असले तरी आता या वादावर निकाल निवडणूक आयोग काय निर्णय घेते, याची उत्सुकता कराड दक्षिण मधील जनतेला लागली आहे.
सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांचे उपोषण नव्या दिवशी सुटले…
दरम्यान, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कापील गावात स्थानिक रहिवासी नसताना नऊ जणांची मतदार नोंदणी झाली आहे. त्यांच्या कागदपत्रांमध्ये गोलमाल असल्याने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींच्यावर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी गेले नऊ दिवस सुरू असलेले सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांचे आमरण उपोषण शुक्रवारी नवव्या दिवशी रात्री तहसीलदार यांच्या आश्वासनानंतर तहसीलदार कल्पना ढवळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या उपस्थितीत सोडण्यात करण्यात आले.