हॉटेलमध्ये होतं कासव पाळलं, पुढे झालं ‘असं’…

चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
अनेक हॉटेलमध्ये आपल्याला फिश टॅंक दृष्टीस पडतो. हॉटेलची सजावट, शोभा वाढविण्यासाठी आणि इतर विविध कारणासाठी हॉटेलच्या दर्शनी भागात फिश टॅंक अनेक हॉटेल मालक साकारत असतात. मात्र या फिश टॅंक मध्ये चुकून कासव पाळलं तर मात्र साताऱ्याच्या महाबळेश्वरात घडलं तसं भलतंच काही घडू शकतं. तेंव्हा हॉटेलमध्ये कुठे कासव पाळला गेलं असेल तर उद्या त्या हॉटेल मालकालाही या सर्व बाबींना सामोरे जावे लागू शकते, हे लक्षात घ्यायला हवं.
महाबळेश्वरात नेमकं काय घडलं, याबाबत महाबळेश्वरच्या वनविभागाकडील माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर मध्ये आज (सोमवार दि. 10/06/2024 रोजी ) वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर यांना मिळालेल्या मौजे हरचंदी, (मोरेवाडी) येथील महाबळेश्वर- तापोळा मार्गावरील निलमोहर अॅग्रो रिसॉर्टमधिल फिश टँक मध्ये भारतीय मऊ पाठीचे कासव (Indian Softshell Turtle) पाळले असल्याची माहिती गोपनीय खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार वन विभागाच्या पथकाने सदर हॉटेलवर छापा टाकून कारवाई केली. त्यामध्ये तेथे मऊ पाठीचे भारतीय कासव आढळून आले. हे कासव वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 मधील अनुसुची 1 मधिल वन्यप्राणी असून ते पाळण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे वन विभागाने हॉटेल मालक आरोपी विजय बबन शिंदे, रा.हरचंदी, (मोरेवाडी) ता. महाबळेश्वर यांचेवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 अन्वये वन गुन्हा दाखल करुन सदरचा वन्यप्राणी भारतीय मउ पाठीचे कासव (Indian Softshell Turtle) ताब्यात घेतला.
सदरची कारवाई सातारा वन विभागाच्या उपवनसंरक्षक श्रीमती. आदिती भारद्वाज, व सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) महेश झांजुणे यांचे मार्गदर्शनाखाली महाबळेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे, तापोळा वनपाल श्रीमती. अर्चना शिंदे, महाबळेश्वर वनपाल सहदेव भिसे, वनरक्षक अभिनंदन सावंत, लहू राऊत, विलास वाघमारे, संदीप पाटोळे, श्रीमती रेश्मा कावळे, श्रीमती मिरा कुटे, श्रीनाथ गुळवे, विश्वंभर माळझळकर यांनी यांच्या पथकाने केली. पुढील तपास महाबळेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे करत आहेत.