स्टार वन न्यूज वर्तमानच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांचा सत्कार; सांगली जिल्हा कलाकार संघटनेचे अध्यक्ष सुनील तोरणे ‘कलारत्न’ पुरस्काराने सन्मानित

विटा प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
स्टार वन न्यूज वर्तमान या वाहिनीच्या द्वितीय वर्धापन दिन सोहळ्याचा उत्सव उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार डॉ. विजय साळुंखे, संजय गांधी निराधार योजना नायब तहसीलदार तोबरे साहेब, विटा नगरपालिकेचे माजी नगर उपाध्यक्ष संजय भिंगारदेवे मेहरबान आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्टार वन न्यूजचे सर्व पदाधिकारी उपस्थित असताना, श्री. सुनील भिमराव तोरणे यांना ‘कलारत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. समाजसेवेबरोबरच कलाकारांना जागृत करून संघटित करण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्यात सौ. अश्विनी तोरणे, शुभम तोरणे, गणेश तोरणे, गणेश माने, सोनू साठे, गणेश भिसे, गणेश मंडले व दिव्यांग कलाकार दशरथ मोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुनील तोरणे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या सांगली जिल्हा कलाकार संघटनेचे अध्यक्ष असून, घरनिकी (ता. आटपाडी) गावचे सुपुत्र आहेत. प्रसिद्ध हालगीपटू आणि प्रबोधनकार पोतराज म्हणून त्यांचा लौकिक आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कलाकार त्यांचे शिष्य आहेत.
सामाजिक कार्यातही त्यांनी ठसा उमटवला असून, आरपीआयच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना मदत, हलगी व लेझीम विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिनानिमित्त विधायक उपक्रम, तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर आंदोलने आणि निवेदनांच्या माध्यमातून शासन दरबारी प्रश्न मांडून त्यांचे निराकरण केले आहे. गरजू महिला, वंचित, उपेक्षित वर्ग तसेच सेवाभावी संस्थांना त्यांनी वेळोवेळी हातभार लावला आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून स्टार वन न्यूज वर्तमानने ‘कलारत्न’ पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले.