मोक्क्यातील व तडीपार गुंडांना जेरबंद करून तब्बल 6 देशी पिस्तुले व जिवंत काडतुसे जप्त
पालखी सोहळा व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दमदार कामगिरी

सातारा | चांगभलं वृत्तसेवा
आगामी बकरी ईद व श्री. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळयाच्या अनुशंगाने विनापरवाना शस्त्र बाळगणारे इसमांची व हददपार इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सपोनि रोहित फार्णे यांचे अधिपत्याखाली विशेष पथक तयार करुन कारवाई सुरू केली आहे. या पथकाने गुरुवारी (दि.5) मोक्क्यातील व तडीपार गुंडांना जेरबंद करून तब्बल 6 पिस्तुले व जिवंत काडतुसे जप्तयातून जामीनावर सुटलेल्या व तडीपार करण्यात आलेल्या दोघांना जेरबंद करून त्यांच्याकडून तब्बल सहा देशी पिस्तुले, तीस जिवंत काडतुसे व एक कार मिळून 15 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची अलीकडच्या काळातील ही दमदार कामगिरी समजली जात आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गुरुवार, दि.5 जून रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, मोक्क्यातुन जामीनावर सुटलेले व सातारा जिल्हयातुन तडीपार असलेले संशयित अमीत ऊर्फ बिऱ्या कदम रा.लोणी, ता. खंडाळा, जि. सातारा व विशाल महादेव चव्हाण रा. भोळी ता. खंडाळा, जि. सातारा हे त्यांचेकडील मारुती सुझुकी कंपनीची एक्सल 6 मॉडेलची राखाडी रंगाची कार क्रमांक एमएच-12-टीएस-1889 मधुन निरा ते लोणंद जाणारे रोडवर देशी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतुसे विक्री करणे करीता येणार आहेत. त्यावरून पो. नि. अरुण देवकर यांनी सपोनि रोहित फार्णे यांना त्यांचे पथकासह नमुद ठिकाणी जावुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने लोणंद ते निरा जाणारे रोडवरील रेल्वे पुलावर सापळा लावुन कार क्रमांक एमएच-12-टीएस-1889 मधील संशयित बिऱ्या कदम व विशाल चव्हाण या तडीपार गुंडाना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन 6 देशी बनावटीची पिस्टल (अग्नीशस्त्र), 6 मोकळ्या मॅग्झीन, 30 जिवंत काडतुसे, 2 मोबाईल हॅन्डसेट व कार असा एकुण 15 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला. याप्रकरणी दोन्ही संशयीतावर लोणंद पोलीस स्टेशन येथे अवैध शस्त्र बाळगुन तडीपारीचा भंग केलेबाबत व भारतीय हत्यार अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी सातारा जिल्हयातील तडीपार व अवैध अग्नीशस्त्रे बाळगणारे इसम यांचेवर यापुढे करडी नजर ठेवुन कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस दलाला दिल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि रोहित फार्णे, पोउनि परितोष दातिर, विश्वास शिंगाडे, सहा. फौजदार अतीष घाडगे, हवालदार विजय कांबळे, शरद बेबले, लेलैश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, अमित सपकाळ, अमित माने, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, मोहन पवार, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर, लोणंद पोलीस स्टेशनकडील पोलिस उपनिरीक्षक घुले, धुमाळ, नाना भिसे, अतुल कुंभार, सायबर पोलीस स्टेशनकडील हवालदार यशवंत घाडगे यांनी केली आहे. कारवाई करणाऱ्या पथकाचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ . वैशाली कडुकर यांनी अभिनंदन केले आहे.