वडगाव हवेली येथे महसूल विभागाचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न – changbhalanews
Uncategorized

वडगाव हवेली येथे महसूल विभागाचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न

कराड | चांगभलं वृत्तसेवा
महाराष्ट्र शासन महसूल विभागाचे मंडल स्तरावरचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान हे कराड तालुक्यातील शेणोली मंडलातील वडगाव हवेली येथे संपन्न झाले. त्यास परिसरातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामस्थांच्या महसूल विषयक नोंदींची व दाखल्यांची कामे जागेवरच करून देण्यात आली.

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार महसूल विभागातील क्षत्रिय स्तरावर ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य जनता शेतकरी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकालात काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करत कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये मंडल स्तरावरती समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेची बळकटीकरण या योजनेअंतर्गत जनतेस सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान हे मंडल स्तरावरती कराड तालुक्यात आयोजित करण्यात आले.‌ जिल्हाधिकारीसो सातारा यांचे मार्गदर्शनाखाली व उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली कराड तालुक्यातील शेणोली मंडलामध्ये वडगाव हवेली येथे सदरचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, य. मो. कृष्णा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन जगदीश जगताप, गावचे सरपंच राजेंद्र जगताप, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, नायब तहसीलदार युवराज पाटील, मंडल अधिकारी प्रवीण शिंदे, व शेणोली मंडलातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक तसेच मंडलांमधील सर्व पोलीस पाटील, सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीमती कल्पना ढवळे यांनी प्रास्ताविकात सदरचे अभियान हे राज्य शासनाने सुरू केले असून त्याद्वारे सर्व जनतेची कामे गावामध्येच करण्यात येत असल्याचे सांगितले. सर्व खात्यामधील अधिकारी यांनी जागेवरच येऊन जनतेची कामे करणे हा‌ या अभियानाचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले. श्री जगदीश जगताप यांनी ग्रामस्थांच्यावतीने मनोगत व्यक्त केले. श्रीमती शैला यादव यांनी विमुक्त व भटक्या जमातींच्या सोयी सुविधाबाबत मार्गदर्शन केले.
श्री अतुल म्हेत्रे यांनी अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले . सदरचं शिबिर हे कराड तालुक्यातील पहिलेच शिबिर असून शाळेच्या विद्यार्थ्यांना गावातच विविध प्रकारचे दाखल्याचे वितरण करण्यात येत आहे. त्याबाबतचे नियोजन प्रत्येक शाळेनुसार व महाविद्यालयानुसार केले आहे. नागरिकांच्या सातबाराबाबत, फेरफार नोंदीबाबत, पानंद रस्त्याबाबत, सलोखा योजनेबाबतही श्री. म्हेत्रे यांनी मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी श्री सुनील ताकटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्री हेमंत बिसके यांनी आभार मानले.

एकाच दिवसाच्या 470 कामे पूर्ण….

या शिबिरामध्ये खालील प्रमाणे एका दिवसात महसूल विषयक कामे पूर्ण करून देण्यात आली. त्यामध्ये
1) गोपाळ समाज जातीचे दाखले वाटप =41
2) नॉन क्रिमीलेयर दाखले =10
3) उत्पन्न दाखले =55
4) रहिवासी दाखले =43
5) जातींचे दाखले =4
6) एकुमा नोंदीचे फेरफार व 7/12=195
7) लक्ष्मी मुक्ती योजनेचे = 36
8) वारस नोंदी = 50
9) अ. पा. क. नोंदी =3
10) रेशनिंग कार्ड = 5
11) पी. एम. किसान नोंदणी (KYC) = 5
12) एग्री स्टॅग नोंदणी= 5
13) इतर विभाग = 16
एकूण = 470
या कामांचा समावेश आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close