डॉ. सुभाष एरम डॉक्टर व बँकर म्हणून यशस्वी
सुभाषराव जोशी; कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी : –
स्व.द.शि. एरम यांचा सामाजिक वारसा जपत डॉ. सुभाष एरम यांनी अर्बन संस्कृती वाढविण्यास विशेष योगदान दिले आहे. ते त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात उत्तम डॉक्टर व बँकेचे अध्यक्ष म्हणून उत्तम बँकर अशा दुहेरी भूमिकेत यशस्वी ठरले आहेत. डॉ. सुभाष एरम यांनी त्यांच्या २१ वर्षाच्या अध्यक्षपदाच्या काळात सभासदांच्या मागण्या आणि अपेक्षा पुर्ण करत असताना नेहमीच बँकेच्या हितास प्राधान्य दिले; यामुळेच सभासदांचा त्यांच्यावर अढळ विश्वास असल्याचे मत अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी यांनी व्यक्त केले.
कराड अर्बन बँकेच्या वतीने अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांच्या वाढदिवसानिमित्त बँकेच्या यु.पी.आय. सेवेचा लोकार्पण सोहळा, नवीन ‘दिनदर्शिकेचे प्रकाशन, नवीन वेब साईटचे लोकार्पण व युवा सभासद मेळावा बँकेच्या शताब्दी सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव व बँकेचे संचालक व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तसेच सभासद ग्राहक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांचा व त्यांच्या सुविद्य पत्नी
सौ. रश्मी एरम यांचा बँकेच्यावतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.
बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी म्हणाले की डॉ. सुभाष एरम हे उच्च शिक्षित, सुप्रसिद्ध डॉक्टर असून देखील १०८ वर्षाच्या सहकारी बँकेचे सलग २१ वर्षे अध्यक्ष राहिलेले शांत, संयमी व विनयशील व्यक्तीमत्व आहे.
अर्बन परिवारातील सर्वसंस्थांच्या वतीने शुभेच्छा देत असताना अर्बन बझार व स्व.डॉ.द.शि. एरम अपंग सहाय्य संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. जयश्री गुरव यांनी डॉ. सुभाष एरम हे अर्बन परिवारातील संलग्न संस्थांचे पालक आहेत. त्यांनी स्व. बाबांचा सामाजिक वारसा कार्यक्षमपणे पेलला आहे. संकटकाळात संयम ठेवत खंबीरपणे कसे उभे रहावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. सुभाष एरम आहेत असे सांगितले.
सत्कारास उत्तर देत असताना डॉ. सुभाष एरम यांनी सांगितले की, स्व. डॉ. द.शि.एरम यांचे संस्कार, ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी यांचे मार्गदर्शन, आजी-माजी संचालकांचे सहकार्य, सभासदांचा विश्वास आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांचे बँकेच्या प्रगती विषयी असणारी महत्वाकांक्षा यामुळेच मी माझी २१ वर्षाची अध्यक्षपदाची धुरा लिलया सांभाळली आहे. कराड अर्बन बँक सेवकांच्या हाताता अत्यांत सुरक्षीत असून सभासदांनी बँकेच्या भविष्याबद्दल काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमासाठी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक करत असताना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी डॉ. सुभाष एरम यांच्या वैयक्तीक आयुष्यातील यशस्वीतेचा आणि अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बँकेने केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा सादर केला. तसेच बँकेने प्रकाशित केलेल्या सन २०२५ च्या संतांची मांदियाळी या दिनदर्शिकेची वैशिष्टये सांगितली आणि बँकेच्या नवीन वेब साईटची ओळख करून दिली. तसेच -डॉ. सुभाष एरम यांच्या वाढदिवसानिमित्त बँकेच्या युवा सभासद-ग्राहकांसाठी प्रफुल्ल वानखेडे यांचे प्रसिद्ध पुस्तक ‘गोष्ट पैशापाण्याची’ या पुस्तकांचे वाटप करण्यात येत असून बँक नेहमीच सभासदांना आर्थिक नियोजन करण्यासाठी आगळे- वेगळे उपक्रम सातत्याने राबवित असते. यंदा बँकेने देशाचे भविष्य असणाऱ्या युवा पिढीस अर्थ साक्षर बनविण्याचे ध्येय हाती घेतले असून त्याचाच एक धागा म्हणजे बँकेच्या युवा सभासदांना देण्यात येत असलेले ‘गोष्ट पैशापाण्याची’ हे पुस्तक असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित सभासद ग्राहकांच्या वतीने संजय माने, शंकर खबाले, विशाल पोळ, केदार ताटके, हरिदास पाटील, प्रसाद मते, उदयकुमार जंगम, उदय थोरात व प्रा. धनंजय बकरे यांनी डॉ. सुभाष एरम यांना मनोगतरूपी शुभेच्छा दिल्या. यावेळी बँकेच्या युवा सभासद-ग्राहकांना सायबर सेक्यूरिटी या विषयावर बँकेचे उपमहाव्यस्थापक प्रितम शहा यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेहांकीता नलवडे यांनी तर आभार सहाय्यक महाव्यवस्थापक सुहास पोरे यांनी मानले.