कराड-मलकापुरात कॅफेंवर कारवाईचा दणका – changbhalanews
क्राइम

कराड-मलकापुरात कॅफेंवर कारवाईचा दणका

उपविभागीय पोलिसांच्या चार पथकांकडून चालक-मालकांवर गुन्हे

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड उपविभागीय पोलीस पथकाने शुक्रवारी कराड, मलकापूर परिसरातील कॅफेंवर कारवाईचा अचानक धडाका सुरू केला. पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चार स्वतंत्र पथके चार बाजुला पाठवत अचानक केलेल्या कारवाईत अनेक जोडपी पोलिसांच्या कारवाईत अडकली. त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा कलमान्वये कारवाई करण्यात आली असून वारंवार सुचना देऊनही प्रेमीयुगुलांना कॅफेत आडोशाची जागा करून ठेवणाऱ्या कॅफे चालक व मालकांवरही गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही वेगाने सुरू होती असे समजते. अवघ्या दोन तासांच्या कारवाईत दहा कॅफेंवर कारवाईचा बडगा उगारला.

कराड, मलकापूर परिसरात अनेक ठिकाणी आडोशाला तर सेवारस्त्यालगत कॅफेंची संख्या वाढली असून या कॅफेंमधे प्रेमीयुगूले तासन् तास अश्लिल चाळे करत बसलेली असतात. यातून एखादा गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक यापुर्वी यातून असे काही गंभीर गुन्हे घडले आहेत. यासंदर्भात पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी साध्या वेशातील पोलिसांमार्फत खात्री करून एकाचवेळी चार पथकांकडून कारवाई करण्याची व्युहरचना आखली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, साक्षात्कार पाटील, यांच्यासह संतोष सपाटे, आसिफ जमादार, प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी, मयूर देशमुख, अनिकेत पवार, महिला पोलीस कांचन हिरवे, ज्योती काटू, वैशाली यादव, धनश्री माने या पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेली चार पथके तयार करून ती कॅफेच्या परिसरात अचानक पाठवण्यात आली. एकाचवेळी कारवाई झाल्याने कॅफेचालकांची चांगलीच पाचावर धारण बसली. कॅफेच्या नावाखाली सुरू असलेले अश्लिल उद्योगास प्रोत्साहन देण्याचे प्रकार उघडकीस आले. पोलीस उपअधिक्षक ठाकूर यांनी कॅफे चालक मालकांसह तिथे असलेल्या जोडप्यांना ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार कॅफेत आढळलेल्या जोडप्यांवर मुंबई कायदा कलमान्वये कारवाई करण्यात आली असून कॅफे चालक मालकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.यापुढेही गैरप्रकार चालणारे कॅफेंवर कारवाई सुरूच ठेवावी असे आवाहन पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी केले आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close