सर्व को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्यांनी सौर ऊर्जेतून स्वावलंबी व्हावे — उर्जा मित्र रामचंद्र देशमुख

कराड | चांगभलं वृत्तसेवा
श्री साईकृपा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, मर्या. गोवारे, (कराड)च्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उर्जा मित्र व भारत सरकारचे निवृत्त वरिष्ठ वैज्ञानिक, जैव ऊर्जा प्रकल्प ऊर्जा मित्र रामचंद्र देशमुख यांनी सर्व लहान-मोठ्या को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्यांना सौर ऊर्जेचा वापर करून स्वावलंबी होण्याचे आवाहन केले.
रविवार, १० ऑगस्ट रोजी झालेल्या या सभेत अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य श्री शिवाजीराव पाटील होते. दीपप्रज्वलन, श्री साई पूजन आणि डॉ. श्रेया काटकर यांच्या गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर संस्थेचे मुख्य प्रवर्तक श्री चंद्रकांत चव्हाण यांनी संस्थेची १९८४ पासूनची वाटचाल, पायाभूत सुविधा उभारणीसाठी माजी सहकार मंत्री मा. श्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण, तसेच मा. श्रीमती अपर्णा यादव (उपनिबंधक सहकारी संस्था, कराड) आणि श्री टी. पी. देशमुख (सहकारी अधिकारी श्रेणी एक, कराड) यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला.
श्री देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संस्थेत १८ बंगले असून प्रत्येक बंगल्यावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारल्यास राष्ट्रीय ऊर्जा बचत अभियानात मानाचे स्थान मिळेल. संस्थेच्या खुल्या जागेत जैव कचऱ्याचे व्यवस्थापन करून बायोगॅस व गांडूळ खत निर्मिती सारखे प्रकल्प राबवून संस्था स्वावलंबी होऊ शकते.
सभेत “कर्तुत्वान पिढी कौतुक सोहळा” या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यात आली. विविध क्षेत्रात कार्यरत सभासदांच्या मुला-मुलींना गुलाब पुष्प आणि पालकांच्या कष्टांचे प्रतीक म्हणून स्मृतिचिन्ह देण्यात आले. विशेष म्हणजे, श्री पवन चव्हाण हे सहकुटुंब यूकेहून खास या कार्यक्रमासाठी आले होते. तसेच मुंबई, पुणे, सांगली, गोवा आदी ठिकाणांहून अभियंते, डॉक्टर, कृषी क्षेत्रातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रा. कल्याणी राजोपाध्ये, पोलिस निरीक्षक सौ. अस्मिता पाटील आणि श्री पवन चव्हाण यांनी बालपणीचे मित्रमंडळ पुन्हा एकत्र आल्याचा आनंद व्यक्त केला आणि असे उपक्रम नियमित करण्याचे सुचविले.
या कार्यक्रमास प्रा. महेश पाटील (एकलव्य करिअर अकॅडमी), अॅड. विजय मदने, हेमंत लादे (ग्रा.पं. सदस्य), शंकरराव कोळगे, दादासाहेब कोळेकर (कराड पंचायत समिती) यांसह मान्यवर उपस्थित होते.
संचालन डॉ. सचिन जाधव यांनी केले तर आभार प्रा. बाळासाहेब माने यांनी मानले.