बचत गट उत्पादित माल खरेदी करून ‘उमेद’ला बळ द्या
कराड येथे 'उमेद बांबू महोत्सवा'चे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या हस्ते संपन्न
चांगभलं ऑनलाइन | कराड
महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची प्राधान्याने खरेदी करून महिला सक्षमीकरण करणाऱ्या उमेद बचत गटांची चळवळ भक्कम करण्यासाठी बळ द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले.
पर्यावरण पूरक आणि किफायतशीर बांबू लागवडीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अर्थात उमेद अभियान पंचायत समिती कराड आणि बांबू विकास मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (दि.६) नोव्हेंबर ते गुरुवार (दि.९) नोव्हेंबर दरम्यान कराड आयोजित भव्य ‘उमेद बांबू महोत्सवा’चे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी अतुल मेहत्रे, प्रकल्प संचालक संतोष हराळे, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी विजय विभुते उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे, तालुका अभियान व्यवस्थापक निलेश पवार, बांबू विकास मंडळाचे अजित भोसले, बांबू उद्योजक प्रवीण सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ज्ञानेश्वर खिलारी म्हणाले, सातारा जिल्ह्यात बांबू लागवडीची चळवळ वाढवण्यासाठी व्यापक प्रयत्न केले जात आहेत याचाच एक भाग कराडचा बांबू महोत्सव आहे. यामध्ये पर्यावरण पूरक बांबूची शेती केली जावे तसेच यातून उत्पादित होणाऱ्या मालाची मूल्यवर्धन करून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात. यासाठी मोठ्या प्रमाणावर चळवळ उभी केली जात आहे. उमेद अंतर्गत कार्यरत स्वयंसहायता समूहाने बांबू बरोबरच इतर विविध उत्पादने निर्माण करून आत्म निर्भर होण्यासाठी लघु उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पादने सुरू केली आहेत. याला बाजारपेठ मिळाली तर ही चळवळ अधिक बळकट होईल. यासाठी बचत गट स्वतःच्या कौशल्यातून बाजारपेठ शोधतच आहेत याला थोडासा हातभार म्हणून प्रत्येक पंचायत समिती स्तरावर दिवाळी सणाची औचित्य साधून प्रदर्शने भरविण्यात आले आहेत याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
महोत्सवास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला या महोत्सवाच्या निमित्ताने मोठी मागणी निर्माण झाली. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी तालुका व्यवस्थापक नीता एडके, श्रीकांत कुंभारदरे, प्रभाग समन्वयक माधवी वनारसे, ऐश्वर्या कुंभार, धनंजय पाटील, उस्मान मुलानी, चिन्मय वराडकर सुशांत तोडकर, प्रवीण देसाई, करण जाधव तसेच उमेद अभियाना अंतर्गत कार्यरत सर्व महिला कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.