“तू तर रंग बदलणारा सरडा!”

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
“सरड्यासारखा रंग काय बदलतोस”, “रंग बदलायला तू काय सरडा आहेस का?” , “तू तर रंग बदलणारा सरडा” असे आपण एकमेकांना ‘सरड्या’चा उल्लेख करत बोलत आणि ऐकत असतो. रंग बदलणं हा सरड्याचा गुणधर्म. त्याच्या या शारीरिक वैशिष्ट्यामुळे सरडा प्राणीमात्रातच नव्हे तर मानवी जीवनात आपले वेगळे महत्व टिकवून आहे. सरड्याच्या अनेक प्रजाती असल्या तरी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पठारावर आढळणारी “सुपरबा सरडा” ही प्रजात काही खास आहे. चला तर मग जाणून घेऊया या सुपरबा सरड्याबद्दल…
सुपरबा सरडा अर्थात फॅन थ्रोटेड लिझार्ड या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रजातीचा हा सारडा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळतो. हा सरडा मादीला आकर्षित करण्यासाठी त्याच्या गळ्यातील चमकदार बहुरंगी पंखा दाखवतो.
ही पठारावर आढळणारी सरड्याची एक अनोखी प्रजात आहे. मोसमी वनस्पती, दगड, लहान गुहा, नाजूक परिसंस्थेसह लटकलेल्या खडकांवर ते आढळतात. अद्वितीय जैवविविधता असलेली सरडा सुपरबा प्रजाती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पठारावर आढळणाऱ्या स्थानिक प्रजातींपैकी एक आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये कधी भ्रमंती करायची संधी मिळाली किंवा सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये भ्रमंती करताना सुपरबा सरडा आढळला तर त्याच्या गळ्यावरील रंगबेरंगी पंख्यामुळे त्याला कॅमेराबद्ध करायचा मोह झाला नाही तर नवलच!
(छायाचित्रे : रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक, कराड)