गमेवाडीत विहीरीत पडलेला बिबट्याचा बछडा वाचविण्यात यश
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
विहिरीत पडलेला बिबट्याचा बछडा वाचवण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले. वाचवलेल्या बिबट्याचे व मादीचे पुनर्मिलन घडविण्याचे कामही वनविभागाच्या रेस्क्यू टीमने यशस्वीपणे केले. ही घटना शनिवार २ डिसेंबर रोजी सकाळी गमेवाडी ता.कराड येथील उत्तम शंकर जाधव यांच्या बोडका म्हसोबा शिवारात घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, गमेवाडीच्या बोडका म्हसोबा शिवारात उत्तम जाधव यांच्या मालकीची विहीर आहे. त्यामध्ये शनिवारी सकाळी एक बिबट्याचे पिल्लू पडले असल्याचे सकाळी त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सदर घटनेची माहिती तात्काळ पोलीस पाटील शंकर जाधव यांना दिली. पोलीस पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कराड वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार नवले यांना कळविले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सदर पिल्लू अथक प्रयत्न करून सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सुखरूप विहिरीतून बाहेर पिंजऱ्यात काढले.
मादी व बछडा यांचे पुनर्रमिलन….
सदर बिबट्याचा बछडा हा साधारण दोन महिन्यांचा व नर जातीचा होता. तसेच तो सुस्थितीत होता. बिबट्याच्या बछड्याचे मादी बरोबर पूनर्रमिलन करण्यात वनविभागने प्रयत्न सुरू करत मोहीम राबवली व रात्री ९.३० वाजता मादी बिबट्या येऊन आपल्या पिल्लाला सोबत घेऊन गेला. पिल्लाला एका विशिष्ट पिंजऱ्यात ठेवण्यात आले व त्याचे दार पूलीच्या सहायाने लांब बांधून ठेवण्यात आले. साधारणपणे पिंजऱ्यापासून पुली ओढणारे २५० फूट लांब अंतरावर होते. पिंजऱ्या शेजारी हालचाल टिपण्यासाठी विशिष्ट कॅमेरे लावण्यात आले होते. मादी बिबट्या साधारण रात्री ९.३० वाजता पिंजऱ्या शेजारी घुटमुळू लागली, हे कॅमऱ्यामध्ये दिसले, त्या क्षणी पुलीच्या साहय्याने दोर ओढून पिंजरा दार उघडुन पिल्लांना मादी जवळ मुक्त करण्यात आले.
रेस्क्यू मोहीम राबवणारी टीम अशी….
रेस्क्यू मोहिमेत कराड वनविभागाचे वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल बाबुराव कदम, वनरक्षक कविता रासवे, वनरक्षक राठोड, वनमजूर मयूर, शिबे, योगेश बेडेकर , प्राणीमित्र अजय महाडीक, रोहीत कुलकर्णी, गणेश काळे, मयुर लोहाना, मयुरेश शानबाग, पोलीस पाटील शंकर जाधव यांच्या टीमचा समावेश होता. तसेच रेस्क्यूचे नरेश चांडक, सिधी पांचारीया यांनीही सहभाग घेत पूनर्रमिलन घडविण्यात मोलाची भूमिका पार पाडली.