
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात मोठा विकासनिधी मला आणता आला, याचे समाधान आहे. त्यामधून रस्ते, पूल, पाणंद रस्ते यासारख्या पायाभूत सुविधांची कामे मार्गे लागली आहेत. एवढ्यावरच न थांबता आपल्या भागात रोजगार निर्मितीसाठी मोठमोठे औद्योगिक प्रकल्प आणण्यासाठी मी काम करत राहणार आहे, असे प्रतिपादन कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.
काले (ता. कराड) येथे रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी रात्री झालेल्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील, व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील, दत्तात्रय देसाई, गणपतराव हुलवान, सुलोचना पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, कराड दक्षिणमधील माता-भगिनींचे कल्याण व्हावे, युवकांच्या हाताला काम मिळावे आणि कराड दक्षिणचा शाश्वत विकास घडावा, यासाठी माझा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी मला एक संधी द्या. तुमचा सेवक म्हणून काम करण्यासाठी मी सदैव तत्पर असेन.
विद्यमान लोकप्रतिनिधी हे खूप मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांनी इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी मतदार संघाच्या बाहेर जायला हवे होते. मात्र ते मतदार संघ सोडून कुठेही गेलेले नाहीत, त्याचे कारण काय असेल सर्वांना समजू शकते. गेल्या ५ वर्षांत ते मतदारसंघातील गावांमध्ये फिरकलेले नाहीत. कार्यकर्ते व मतदारांनाही ते ओळखत नाहीत, अशी टीका डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या सभेत केली.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने महिला, शेतकरी, विद्यार्थी यांच्यासाठी असंख्य योजना राबवल्या. राज्यातील महायुती सरकारनेही सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून अनेक योजना राबवल्या. शासनाच्या या योजनांचा लाभ कराड दक्षिणमधील लोकांना मोठ्या प्रमाणावर मिळवून देण्यासाठी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.
प्रा. मच्छिंद्र सकटे म्हणाले, कराड दक्षिणचे विद्यमान लोकप्रतिनिधी गत २० वर्षांपासून तरुणांना संधी मिळाली असे वारंवार सांगत असतात.पण तिकीट द्यायची वेळ आली की स्वत:च उमेदवारीचे तिकीट घेतात . त्यामुळे जनतेने आता त्यांना घरी बसवून कराड दक्षिणच्या प्रगतीसाठी डॉ. अतुलबाबांना साथ द्यावी.
या सभेत महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघाच्यावतीने डॉ. अतुलबाबा भोसले यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. कार्यक्रमाला सुहास जगताप, दादा शिंगण, शिवाजीराव थोरात, आत्माराव तांदळे, ॲड. दीपक थोरात, माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय निकम यांच्यासह कार्यकर्ते, मतदार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.