चोरीची मोटारसायकल कराड वाहतूक शाखेच्या ताब्यात
चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
कराड वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या प्रयत्नामुळे चोरीची मोटरसायकल पकडण्यात यश मिळाले आहे. सदर एफ झेड मोटरसायकल ही जत (जि. सांगली) पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झाली होती. याबाबत मोटरसायकलस्वारास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिपक किसन पोळ वय २४ वर्षे , रा. शामगाव ता. कराड जि.सातारा असे ताब्यात घेतलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
कराड शहर वाहतूक पोलिसांच्या शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि.१ डिसेंबर रोजी नेमण्यात आलेल्या कर्तव्यावरील अंमलदार हवालदार शरद विष्णु चव्हाण व वैभव बापुराव यादव यांना दत्ता चौक ते विजय चौक या दरम्यान समोरून येणारे ग्रे रंगाची एफ झेड मोटारसायकलचा संशय आला. त्यांनी गाडी थांबवून चौकशी केली असता सदरची मोटरसायकल हे चोरीची असल्याचे व ती जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झाली असल्याचे निष्पन्न झाले. तिचा मूळ क्रमांक ए.पी. २१ बी जे ६०२१ असा असल्याचे व मूळ मालक नागेंद्र कुर्णा रा. आदोनी, कर्नाटक असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी दुचाकीस्वार दीपक पोळ यास ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी दुचाकीसह शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी चेतन मछले, सहा पोलीस उपनिरीक्षक नाफड. भोइटे, हवालदार शरद चव्हाण, सुरेश सावंत, मनोज् शिदे, सचिन साळुंखे, संतोष पाटणकर, वैभव यादव यांनी केली.