भाजपा सरकारचे कराड दक्षिणवर विशेष लक्ष : मदनराव मोहिते
विंग येथे ७३ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन उत्साहात
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारचे कराड दक्षिणवर विशेष लक्ष आहे. विकासाची आस असलेल्या डॉ. अतुल भोसलेंना ताकत देण्यासाठी सरकारकडून भरभरून विकासनिधी दिला जात आहे. डॉ. अतुल भोसलेंच्या सक्षम नेतृत्वामुळे गेले वर्षभर कराड दक्षिणमध्ये विकासाचा झंझावात सुरू आहे, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते यांनी केले. विंग (ता. कराड) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून विंग येथे कणसे पाणंद ते विंग वेशीपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण (५० लक्ष), वेताळनगर रस्ता काँक्रीटीकरण (१० लक्ष), सुरेश नलवडे घर ते प्राथमिक आरोग्य केंद्र रस्ता खडीकरण व डांबरीकरण (५ लक्ष), जिल्हा परिषद शाळा खोल्या दुरुस्ती (५ लक्ष) आणि व्यायाम शाळा साहित्य (३ लाख) असा एकूण ७३ लाख रुपयांचा विकासनिधी प्राप्त झाला आहे. या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन डॉ. अतुल भोसले व कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक बबनराव शिंदे, सयाजी यादव, श्रीरंग देसाई, कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ. रेखाताई पवार, कराडचे माजी नगरसेवक सुहास जगताप, उद्योजक आर. टी. स्वामी, मुकुंद चरेगावकर, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा डॉ. सारिका गावडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सूरज शेवाळे, घारेवाडीच्या सरपंच सौ. सुवर्णा जाधव, विंगचे उपसरपंच सचिन पाचुपते, विंग सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र खबाले, माजी चेअरमन जयवंत माने, निसार मुल्ला, कृष्णा बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सहकार, कृषी, शिक्षण, आरोग्य, सामाजिक क्षेत्रामध्ये अद्वितीय योगदान दिल्याबद्दल कृष्णा कारखान्याचे चेअरमन व कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांचा विंग ग्रामस्थांच्यावतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. तसेच विंग येथील कर्तृत्ववान मान्यवरांचा सत्कार, भाजपा युवा मोर्चाच्या विंग शाखेचे उद्घाटन आणि आयुष्मान भारत कार्डाचे लाभार्थींना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच भाजपाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.