हैबत आडके | चांगभलं ऑनलाइन
पुणे येथील फुलगावमध्ये आज झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा मल्ल मोहोळचा सुपुत्र सिकंदर शेख याने गतविजेत्या शिवराज राक्षेला आस्मान अवघ्या 10 सेकंदात झोळी डावावर आस्मान दाखवत यंदाची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. या विजयामुळे सिकंदर हा 66 वा महाराष्ट्र केसरी ठरला. कुस्ती क्षेत्रात सह राज्यभरातील क्रीडाशौकीन आणि नागरिकांमधून सिकंदर शेख याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गतविजेत्या शिवराज राक्षेला आस्मान दाखवलं…
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत किताब गतवर्षी शिवराज राक्षे याने पटकावला होता. यंदाही त्याचं आव्हान मोठं असल्याचं अनेकांना वाटत होतं. मात्र सर्वाधिक जलद आणि आक्रमक कुस्ती खेळणारा सिकंदर असा लौकिक असणाऱ्या सिकंदरपुढे शिवराज राक्षेची झुंज अपयशी ठरली. सिकंदरला झोळी घालून अवघ्या दहा सेकंदात चितपट करुन विजय मिळवला. त्यापूर्वी माती विभागात सिकंदरने संदीप मोटेचा पराभव केला होता. त्यामुळे त्याने अंतिम फेरी गाठली. तर हर्षद कोकाटेला गादी विभागात पराभूत करून शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीसाठी पात्र ठरला होता. तशी दोघांमध्ये चुरशीची लढत झाली. या लढतीत सिकंदर शेखने मैदान मारून महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा पटकावली.
सिकंदर गतवर्षी पराभूत झाला होता खरा पण….
सिंकदर शेख हा गेल्या वर्षी सेमी फायनलमध्ये पराभूत झाला होता. त्याला सेमी फायनलमध्ये महेंद्र गायकवाड याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी महेंद्रने बाहेरची टांग डाव टाकत सिकंदरला पराभूत केले होते खरे. परंतु महेंद्र गायकवाडने टाकलेला बाहेरील टांग हा डाव नियमानुसार नव्हता, अशा चर्चा सुरू झाली होती. त्यातून सिकंदरवर अन्याय झाल्याची भावना पश्चिम महाराष्ट्रातील कुस्ती शौकीनांच्यामध्ये मनात घर करून होती. अखेर आजच्या लढतीत सिकंदरला नियतीने न्याय मिळवून दिला अन् महाराष्ट्र केसरीच्या गदेवर त्याचे नाव कोरले गेले.
सिकंदर शेख आहे तर कोण?
सिकंदर हा मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याचा सुपुत्र आहे. त्याला आजोबापासूनचा कुस्तीचा वारसा आहे. त्याचे वडीलही कुस्ती खेळायचे. पण गरिबीमुळे त्यांनी कुस्ती सोडली आणि उदरनिर्वाहासाठी ते हमालीचे काम करत होते. कुस्तीमधील नैपुण्यच्या जोरावर सिकंदर अलीकडेच भारतीय लष्करात भरती झाला आहे. त्यामुळे तो सैन्यदलाकडूनही खेळतो. आपला मुलगा मोठा मल्ल बनावा अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. ती आज पूर्ण करून सिकंदरने आपल्या वडिलांना एक अनोखी दिवाळीची भेट देऊ केली.
आत्तापर्यंत सिकंदरने मिळवली आहेत शेकडो बक्षीस…
सिंकदर हा गतवर्षी सेमी फायनल मध्ये पराभूत झाला होता तरीही त्याची मोठी लोकप्रियता कोल्हापूर, सातारा, सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रात होती. त्याने आतापर्यंत राज्यात आणि देशभरात अनेक कुस्त्या जिंकून नामवंत मल्लांना चिततपट केले होते . त्यामुळे त्याला महिन्द्रा थार चारचाकी, एक जॉन डिअर ट्रॅक्टर, 4 अल्टो कार, 24 बुलेट, 6 टिव्हीएस, 6 सप्लेंडर तर तब्बल 40 चांदीच्या गदा अशी शेकडो बक्षीसं मिळाली आहेत.
सिकंदरचा कराड तालुक्याशी मोठा स्नेह…
महाराष्ट्र केसरीची गदा पटकावलेल्या सिकंदरचा कराड तालुक्याशी मोठा स्नेह आहे. विशेषतः हिंदकेसरी संतोषआबा वेताळ, बेलवडेचे माजी उपसरपंच व गंगावेश तालमीचे मल्ल संभाजी मोहिते यांच्याशी सिकंदरचे मित्रत्वाचे संबंध आहेत. हिंदकेसरी संतोषआबा वेताळ यांनी सिकंदरच्या पाठीशी ठाम उभे राहून त्याला शक्य असेल ती मदत करण्याचा आजवर प्रयत्न केला आहे. एप्रिल महिन्यात भाजपचे नेते, डॉ. अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कराड तालुक्यातील ओंड येथे झालेल्या कुस्ती मैदानात सिकंदर शेख याने हजेरी लावली होती. त्याच्यासमवेत महान भारत केसरी माऊली जमदाडे, उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर असे नामांकित मल्ल या मैदानावर हजर होते. मैदान संपल्यानंतर सिकंदर याच्या सोबतच माऊली जमदाडे व प्रकाश बनकर यांनी बेलवडे बुद्रुक गावाला सदिच्छा भेट दिली होती. यावेळी पैलवान संभाजी मोहिते, सरपंच डॉ. सुशांत मोहिते व त्यांच्या कुटुंबीयांनी सिकंदरचे स्वागत केले होते. यावेळी सिकंदर ने जमदाडे आणि बनकर यांच्या समवेत गावातील तालमीत भेट देऊन सराव करणाऱ्या स्थानिक मल्लांच्या सोबत चर्चा करून फोटोसेशनही केले होते, स्थानिक मुलांना प्रेरणा देण्याचे काम सिकंदर याने यावेळी केलं होतं. तसेच आपण येणाऱ्या वर्षात काहीही झालं तरी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवणारच असून त्यासाठी पंजाबला जाणार असल्याचे त्यांना आवर्जून सांगितलं होतं. हिंदकेसरी संतोषआबा वेताळ यांच्या सैदापूर येथील कुस्ती आखाड्यालाही सिकंदर याने भेट देऊन तेथील मल्लांना ही ऊर्जा देण्याचं काम केलं होतं.
गंगावेश तालमीला 38 वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची गदा..
कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा देशात मोठा लौकिक आहे. आत्तापर्यंत या तालमीतील मल्लांनी महाराष्ट्र केसरीच्या तब्बल 11 गदा मिळवल्या आहेत. मात्र त्यामध्ये गेल्या 38 वर्षापासून खंड पडला होता. त्यामुळे सिकंदरचे वस्ताद विश्वास दादा हरगुले यांचं गंगावेश तालमीला पुन्हा महाराष्ट्र केसरीची दादा मिळावी आणि 38 वर्षांची प्रतीक्षा संपवावी असं स्वप्न होतं. ते त्यांचा पट्टा सिकंदरने आज पूर्ण केलं. गंगावेश तालमीचा एक मल्ल संग्राम शेवाळे हा मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. त्याने तर गंगावेश तालमीला जो कोणी मल्ल महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून देईल त्याची आपण कोल्हापुरात हत्तीवरून मिरवणूक काढू , असं जाहीर केलं होतं. त्यामुळे लवकरच सिकंदरची कोल्हापूर शहरातून हत्तीवरून मिरवणूक काढली जाण्याची शक्यता आहे.
चालू वर्षी सिकंदरने खेळल्या 6 कुस्त्या…
एन.आय.एस. कोच पै. अमोल साठे म्हणाले की, गतवर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्यानंतर त्याचे पहिले मैदान विकासअण्णा कारंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बनवडी येथे २१ जानेवारीला घेतले होते, तसेच ७ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने येवती ता. कराड येथे युवा उद्योजक दीपकशेठ लोखंडे यांनी घेतले होते, तर १७ मे रोजी वरकुटे ता. माण येथे युवा नेते अभयसिंह जगताप यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान आयोजित केले होते. या तिन्ही मैदानाचे आयोजक आपण स्वतः होतो. चालू वर्षी सिकंदरच्या एकूण ६ कुस्त्या झाल्या.
त्यामध्ये सातारा जिल्ह्यात ३ पैकी कराड तालुक्यात बनवडी आणी येवती येथे झालेल्या दोन्ही लढती सिकंदरने जिंकल्या. वरकुटे येथे इराणच्या हादी पैलवानाबरोबर ५६ मिनीटांनी त्याची कुस्ती बरोबरीत सुटली. आणि सातारा जिल्ह्याचे बाहेर ३ कुस्त्या झाल्या. त्यामध्ये जुळे सोलापूर येथे सिकंदर विजयी, अलिबागला सिकंदर विजयी आणि पुणे जिल्ह्यात झालेल्या कुस्ती मैदानातही सिकंदर विजयी झाला, अशी माहिती पै. अमोल साठे यांनी सांगितली.
राज्यभरातून सिकंदरवर कौतुकाचा वर्षाव
दरम्यान, 66 वा महाराष्ट्र केसरी ठरलेल्या मोहोळचा सुपुत्र आणि कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा मल्ल सिकंदर शेख याच्यावर त्याने महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्याने राज्यभरातील कुस्ती शौकिनांच्याकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. ‘चांगभलं न्यूज’ समूहाकडूनही त्याचे विशेष अभिनंदन!!