चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांया वाढदिवसचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनाच्या मान्यतेने येथे मुख्यमंत्री चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शिवमुद्रा कौलव संघाने विजेतेपद पटकावले.
राज्यातील सुमारे २२ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. पहिल्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत चुरशीचे सामने रंगले. ते पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी उपस्थिती लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर होती.
अंतिम सामना कोल्हापूर जिल्ह्यातील शिवमुद्रा कौलव आणि येळवडे संघात झाला. या चुरशीच्या सामन्यात शिवमुद्रा कौलव संघाने एका गुणांनी येळवडे संघावर मात करत विजेतेपद पटकावले. येळवडे संघास दुसरे तर लिबर्टी तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. उत्कृष्ट पकडसाठी येळवडे संघाच्या खेळाडूस गौरवण्यात आले. लिबर्टीचा खेळाडू वेदांत सोरडे यास उत्कृष्ट चढाई तर कौलवच्या कार्तिक पाटील यास अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
रणजित पाटील नाना, अजित पवार, गुलाबराव पाटील, लिबर्टीचे सचिव रमेश जाधव, राजेंद्र जाधव किशोर शिंदे, विजय गरूड, सचिन पाटील, विनायक पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी लिबर्टीचे उपाध्यक्ष अरुण जाधव, ज्येष्ठ संचालक अँड. मानसिंगराव पाटील उपस्थित होते. त्यांनी विजेत्या संघांचे अभिनंदन केले.
कबड्डी स्पर्धांचे संयोजन लिबर्टी मजदूर मंडळ, रणजीत पाटील (नाना) यांनी केलेले आहे.
पुरुष व्यावसायिक गटाच्या स्पर्धा 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. महिला खुला गटाच्या स्पर्धा 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. 70 किलो गटाच्या स्पर्धा सुरू असून त्यास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.